सोलापूर : माढा विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असतानाच त्याठिकाणी स्थानिक उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. यंदा उमेदवारी माढ्यातील भूमिपुत्राला द्या, त्याऐवजी माळशिरस किंवा पंढरपूर येथे उमेदवारी दिल्यास येथील स्वाभिमानी जनता त्यांना पराभूत करेल असा इशारा संजय पाटील घाटणेकर यांनी दिला. विशेष म्हणजे संजय घाटणेकरांनी हा इशारा मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्यासमोरच दिल्याने मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


माढा विधानसभेसाठी मोहिते पाटील कुटुंबातून भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील किंवा शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला पंढरपूरचे अभिजित पाटील हे देखील माढ्यातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवू शकतात. 


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांनी मोहिते पाटील यांच्या समोरच बाहेरचा उमेदवार येथील स्वाभिमानी जनता सहन करणार असा इशारा दिला. मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात. 


नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघात केवळ माढा, करमाळा व माळशिरस या तीन ठिकाणी मिळालेल्या मताधिक्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले होते याची आठवण त्यांनी करून दिली.  माढ्याने लोकसभेला भरभरून दिले, मात्र आमचा नुसता वापर करून घेऊ नका असा टोलाही घाटणेकर यांनी लगावला. 
     
माढा तालुका हा माढा आणि करमाळा या दोन विधानसभा मतदारसंघात विभागाला गेला आहे. यातील 80 गावे  म्हणजे जवळपास 2 लाख मतदान हे माढा विधानसभामध्ये आहे . तर 36 गावातील  जवळपास सव्वा लाख मतदान हे करमाळा विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे माढ्यातील सव्वा लाख मतदारांना करमाळ्यातील नारायण पाटील याना मतदान करावे लागणार आहे. आता माढा मधील 2 लाख मतदारांनाही माळशिरस किंवा पंढरपूर येथे मतदान करायची वेळ आल्यास तालुक्यातील स्वाभिमानी जनता ही बाब कधीही मान्य करणार नसल्याचा इशारा संजय पाटील घाटणेकर यांनी दिला. 


यावेळी त्यांनी थेट जिल्हाध्यक्ष काका साठे यांना ही बाब शरद पवार याना सांगावी असे सांगत माढा विधानसभेला बाहेरचा उमेदवार चालणार नसल्याचा इशारा दिला. त्यामुळे आता माढ्यातून विधानसभेसाठी प्रयत्न करणाऱ्या मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 


यापूर्वीही 2004 साली माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यावर विजयसिंह मोहिते पाटील यांनी पहिल्यांदा माढामधून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र बाहेरचा उमेदवार नको याच मुद्द्यावर त्यांना माढा सोडून पंढरपूरमधून निवडणूक लढवावी लागली व पराभव पत्करावा लागला होता. आता पुन्हा संजय पाटील घाटणेकर यांनी हाच भूमीपुत्राचा मुद्दा काढल्याने मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळवताना अडचणी होऊ शकतात. 


ही बातमी वाचा: