सोलापूर : लोकसभेतील खासदार निलंबन (Loksabha MP Suspension) प्रकरणानंतर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar Group) आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सोलापुरात (Solapur) जोरदार निदर्शने करण्यात आले. 'जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा' अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केल्याचे पाहायला मिळाले. देशाची वाटचाल हीटलरशाहीच्या दिशेने सुरू आहे का असा संशय यावा अशा पद्धतीने संसदेत खासदारांचे निलंबन करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. 


संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये झालेल्या त्रुटीवर केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधानांनी निवेदन करावं अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 141 खासदारांना निलंबित करण्यात आले आहेत. ज्यात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यासह इतर खासदारांचा देखील समावेश आहे. त्यामुळे यावरून शरद पवार गट आक्रमक झाले आहे. "सुप्रिया सुळे यांना सात वेळा संसदरत्न आणि दोन वेळा महासंसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, त्यांचे देखील निलंबन करण्यात आले. अमोल कोल्हे यांना दोन वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, अशा खासदारांचे निलंबन तुम्ही करत आहात म्हणजे देशाची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असल्याची टीका महबूब शेख यांनी केली आहे. 


देशाचं संरक्षण कसं करणार?


यावेळी बोलतांना महबूब शेख म्हणाले की, "देशाच्या संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी केवळ एवढीच मागणी या खासदारांची होती. जे देशाच्या संसदेचं रक्षण करू शकत नाहीत ते देशाचं संरक्षण कसं करणार? जर संसदेत चर्चा झाली असती तर हे प्रश्न त्यांच्यावर उपस्थित झाले असते म्हणून त्यांनी पळ काढला. त्यामुळेच 141 खासदारांना निलंबित करणार हे भगोडे सरकार आहे. राज्यसभेच्या सभापतींची किती खासदारांनी मिमिक्री केली? ज्या खासदाराने मिमिक्री केली त्यांना समज द्यायला हवी होती, असे महबूब शेख म्हणाले. 


जोरदार घोषणाबाजी... 


शरद पवार गटाच्या खासदारांचे निलंबन केल्याने आज सोलापूरमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 'मोदी शाही हटाव देश बचाव,' 'जो हिटलर की चाल चलेगा, ओ हिटलर की मौत मरेगा', 'देशातील 141 खासदारांचं निलंबन करणाऱ्या सरकारचं धिक्कार असो', 'नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी' आशा घोषणाबाजी देखील करण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Parliament : मोदी सरकारच्या काळात 255 खासदार निलंबित, भाजपचा एकही नाही, डॉ. मनमोहन सिंहांच्या काळात 28 काँग्रेस खासदार निलंबित