सोलापूर : अजितदादांनी पक्ष सोडला नसता तर यावेळी ते महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री झाले असते असा चिमटा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढला. शिंदे-फडणवीस आपल्या मागून मुख्यमंत्री झाले पण आपल्याला संधी मिळाली नाही अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली होती. त्यावर जयंत पाटलांनी मुख्यंमंत्रिपदाबाबत हे वक्तव्य केलं. अकलूजमधील शिवस्वराज्य यात्रेमध्ये जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलं.
लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता बारामतीमध्ये अजित पवारांना घेरण्याची रणनीती सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पवार कुटुंबातील युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी शरद पवार गटाकडून केली जात आहे. त्यातच जयंत पाटलांनी आता अजित पवारांना चिमटा काढला.
काही दिवसांपूर्वी अजितदादांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल खंत व्यक्त केली होती. पण जर त्यांनी पक्ष सोडला नसता तर आगामी काळात महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री झाले असते असं जयंत पाटील म्हणाले.
अजित पवार पाचवेळा उपमुख्यमंत्री झाले, पण त्यांना अद्याप मुख्यमंत्री होता आले नाही. तशी खंत त्यांनी त्यांच्या मागून आमदार होऊन मुख्यमंत्री झालेल्या शिंदे-फडणवीसांच्या समोर बोलून दाखवली होती.
मराठा आरक्षणावर काय म्हणाले जयंत पाटील?
मराठा आरक्षणाबद्दल आमची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्य सरकारने आपला निर्णय घेतल्यानंतर त्यावर महाविकास आघाडी निर्णय घेईल असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची डेडलाईन अद्याप ठरली नाही, त्यावर चर्चा सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली. महायुतीतील आमदार संपर्कात असले तरी ते महाविकास आघाडीमध्ये येण्याची शक्यता कमी असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
ही बातमी वाचा: