पुणे : सत्तेत बसलेल्या लोकांना माहीत आहे की आपण सत्तेतून जाणार आहे. आता लोकांनी चंद्रदेखील मागितला तर ते देतील असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. पवारसाहेबांना कुणी डिवचू नये, त्यांच्या एकदा डोक्यात बसलं की काय खरं नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी राज्यातल्या महायुती सरकारला इशारा दिला. आरक्षणावर नुसता बोलायचं आणि निघून जायचं असं म्हणणाऱ्यांनी त्यांची नीतिमत्ता खुंटीला टांगून ठेवली आहे अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर केली. जयंत पाटील बारामतीमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते. 


महायुती सरकारवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले की, हे महाराष्ट्र विरोधी सरकार सरकार आहे. राज्यात महाविकास आघाडी 170 ते 175 जगावर निवडून येईल. आम्ही सांगत होतो साहेबांना, लोकसभेला 14 जागा घेऊया. पण साहेबांनी 10 जागा घेतल्या. पवार साहेबांच्या डोक्यात एकदा बसलं की काय खरं नाही. त्यांनी एकदा मनावर घेतलं तर पाठ लावून सोडतात. म्हणून त्यांना कुणी डिवचू नये.


आता चंद्र जरी मागितला तर देतील


जयंत पाटील म्हणाले की, सत्तेत बसलेल्या लोकांना माहीत आहे की आपण सत्तेतून जाणार आहे. आता लोकांनी चंद्रदेखील मागितला तर ते देतील. प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी कशी होईल यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केले जातील. भाजपमध्ये राम राहिला नाही, भाजपला राम सोडून गेला आहे. जिथं रामाचे देवळ आहे तिथं यांचा पराभव झाला आहे. युगेंद्र पवार इथे रस घ्यायला लागले आहेत याचा आनंद आहे. युगेंद्र पवारांना आपण साथ देत आहात. नव्या रक्तात तुम्ही नेतृत्व देऊ पाहात आहात. 


जे मिळतंय ते घ्या


राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध घोषणांचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले की, ज्या लाडक्या नव्हत्या त्या आता लाडक्या झाल्या आहेत. दोन-अडीच महिने जे मिळतंय ते घ्या. ही योजना अल्पकालीन ठरू नये म्हणजे झालं. आरक्षण वेळी ते म्हणाले होते आपण बोलायचं आणि निघून जायचं. त्यातील एकाने सांगितले की आपण बोलायचं आणि निघून जाऊ. यांनी नीतिमत्ता खुंटीला टांगून ठेवली आहे. 


युगेंद्र पवार म्हणाले की, निवडणूक घासून होईल असे वाटलं होतं. पण ही निवडणूक घासून नाहीतर कशी झाली ते आपल्याला माहीत आहे. बारामतीमध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या. पवार साहेबांनी समाजाचा विकास केला. इथून पुढंही अशीच साथ द्या. 


वस्तादाला साधंसुधं समजू नका


खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, बारामती आता नवीन युगाचा अनुभव घेत आहे. मौका सबको मिलता है और वक्त सबका आता है. बारामतीने घड्याळाला राम राम ठोकला आहे. हा महाराष्ट्र गुडघे टेकत नाही, महाराष्ट्र ताठ मानेने उभं राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. बारामतीची ओळख ज्यांनी  निर्माण केली आणि त्यांच्यामुळे ज्यांना बारामतीत ओळख मिळाली अशी ही निवडणूक होती. वाघाचे आता मांजर झालं की काय? वस्तादाला साधंसुधं समजू नका. महाराष्ट्र हातात द्या, ज्यांच्या मांडीवर जाऊन बसला त्यांना गदागदा नाही हलवलं तर सांगा. दिल्लीच्या नजरेला नजर मिळवणारे सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. 


कांद्यासंदर्भात माफी का? सरळ निर्णय घ्यायचा


खासदार सु्प्रिया सुळे म्हणाल्या की, पक्षाची ताकद तुम्ही आहात. उगीच आम्ही फकीर समजत होतो, पण मतदारराजा आमच्या सोबत होता. आपल्याला हे सरकार बदलायचं आहे. नाती 1500 रुपयांनी जोडली जात नाहीत. पक्ष,चिन्ह गेलं आता फोन पण हॅक झाला. बीडला आजपर्यंत कुणीच विमानतळ मागितले नव्हतं, पण ते बरंजग बाप्पानी मागितले. कांद्यासंदर्भात कुणीतरी माफी मागितली असं कानावर आलं. माफी कशाला मागायची थेट निर्णय घ्यायचा ना.