Solapur News Update : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत ( Rajendra Raut ) यांच्या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Anti Corruption Department) दिले आहेत. आमदार राजेंद्र राऊत यांनी मोठ्या प्रमाणात अपसंपदा जमा केली असून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार बार्शीतील शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी केली होती. मार्च 2021 मध्ये दाखल झालेल्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने भाऊसाहेब आंधळकर यांनी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. त्याबाबत उच्च न्यायलयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सोलापूरमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्याकडे किती केसेस पेंडिग आहेत यासंदर्भात माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोलापुरात असलेल्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या जवळ असलेल्या पेंडिग केसेसची माहिती सादर केल्यानंतर आमदार राजेंद्र राऊत यांच्या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय पीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि आर. एन. लड्डा यांनी हे आदेश दिले आहेत.
आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांनी बेकायदेशीर मार्गाने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मिळवली आहे. ही मालमता ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त आहे. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार भाऊसाहेब आंधळकर यांनी 14 मार्च 2021 रोजी केली होती. "माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन मी 14 मार्च 2021 रोजी जवळपास 17 यंत्रणांकडे तक्रार केली होती. ईडी, आयकर विभाग आणि लाचलुचपत विभागाकडे देखील तक्रार दिली होती. त्यासाठी विवरणाची प्रतिज्ञापत्रे, मालमत्तेचे उतारे, वाहने यांची छायाचित्रे सादर करून वाढलेल्या स्थावर जंगम मालमत्तेचा तक्ता देखील सादर केला होता. मात्र, याबाबत संबंधित विभागाकडून कार्यवाही होण्यास विलंब होत असल्याने उच्च न्यायलयात धाव घेतली होती. उच्च न्यायलयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यवाहीवर नाराजी व्यक्त करत तीन महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे." अशी प्रतिक्रिया तक्रारदार भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली.
मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार : आमदार राजेंद्र राऊत
"माझ्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एक तक्रार अर्ज दाखल झाला आहे. तो तीन महिन्यात निकाली काढा असे आदेश उच्च न्यायलयाने दिले आहेत. माझी कुठलीही ईडी किंवा आयकर विभागाची चौकशी होणार नाही. तरी देखील मी माझा उद्योग व्यवसाय करताना प्रत्येक रुपयाचा हिशोब आयकर विभागाला देत असतो. दरवर्षी मी रिर्टन्स भरत असतो. कुठलीही चौकशी झाली तर त्याला सामोरं जायला मी तयार आहे." अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे.
राऊतांचा आंधळकरांवर निशाणा
"मी प्रामाणिकपणे राजकारण आणि व्यवसाय करत आहे. त्यासाठी विविध बँकाकडून कर्ज देखील घेतले आहेत. त्यामुळे या चौकशीनंतर तक्रारीत किती तथ्य आहे हे समोर येईल. परंतु, ज्या लोकांनी माझ्या बाबतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी शासनाला किती बुडवलं. किती दरोडे टाकले, कुठल्या खुनाच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग आहे. त्यांच्यावर आयकर विभागाने किती धाडी टाकल्या. आयकर विभागाच्या चौकशीत किती दिवस ते तुरुंगात होते. याचं आत्मपरीक्षण करावे. त्यानंतर माझ्याबाबतीत टीका करावी" असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाऊसाहेब आंधळकर यांच्यावर आमदार राऊत यांनी निशाणा साधलाय.
महत्वाच्या बातम्या