Shahajibapu Patil : पिलीवचे पाणी जाण्याला त्यावेळचे कॅबिनेट मंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil ) यांनी केला आहे. यामुळं पाणी प्रश्नावरुन पुन्हा एकदा सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दोनच दिवसांपूर्वी दुष्काळी भागाला पाणी देणाऱ्यांना तुम्ही घरी बसवले आणि पाणी पळवणाऱ्याला खासदार केले अशी टीका करत स्वतःच्या गालात मारुन घेत शहाजीबापूंनी मोहिते पाटील यांच्यावर टीका केली होती.
नेमकं काय म्हणाले शहाजीबापू पाटील?
शहाजीबापू पाटील यांच्या टीकेनंतर सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शहाजीबापूंनीच माळशिरसचे पाणी पळवल्याचा आरोप केला होता. आता याला शहाजीबापूंनी थेट उत्तर देत ज्या वेळेला आम्ही पाणी मागत होतो तेव्हा माळशिरस तालुक्यातल्या पिलीव भागासह सांगोल्याला पाणी मागितले होते. त्यावेळी तात्कालीन मंत्री महादेव राव शिवणकर यांनी सांगोला व पिलीव साठी 3.81 टीएमसी एवढे पाणी मंजूर केले होते. यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी यातील 1.81 टीएमसी पाणी परांड्यासाठी घेऊन गेले. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील हे कॅबिनेट मंत्री होते..मात्र, त्यांनी माळशिरस तालुक्यातील पिलीव भागातील पाण्यासाठी कोणतेही आंदोलन केले नाही अथवा आवाज उठवला नाही. त्यामुळं माळशिरस तालुक्यातील पिलीवचे पाणी घालवण्यास विजयसिंह मोहिते-पाटील हे जबाबदार असल्याची टीका शहाजीबापू यांनी केली आहे.
संजय राऊत भ्रमिष्ट, त्यांनी उद्धव ठाकरेंचा उरलेला पक्षही संपवण्याची सुपारी घेतलीय
आम्ही मागितलेले पाणी हे पिलीवसह सांगोल्यासाठी होते याचा पुनरुच्चार शहाजीबापूंनी केला आहे. यावेळी शहाजीबापूंनी या वादात थेट जिल्ह्याचे जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर आरोप केल्याने आता पुन्हा राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे. दरम्यान, शहाजीबापूंनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर सडकून टीका करताना ते भ्रमिष्ट झाले आहेत. उद्धव ठाकरेंचा उरलेला पक्षही संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी उचलल्याचा टोला शहाजीबापूंनी लगावला आहे.
महत्लाच्या बातम्या: