सोलापूर : देशातील 100 शहरांना स्मार्ट सिटी (Smart city) योजनेंतर्गत क्लास बनवायचं, या योजनेतून या शहरांचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करायचा निर्धार केंद्रातील मोदी सरकारने केला होता. मात्र, गेल्या 10 वर्षात म्हणावं तसं काम या योजनेवर झाल्याचं दिसून येत नाही. या स्मार्ट सिटी योजनेत सोलापूर (Solapur) शहराचाही समावेश होता. आता, या शहराला स्मार्ट बनविण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांसाठीच्या पाईपांना आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सरकारी मालमत्तेचे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
सोलापूर शहरातील बार्शी रोडवर ठेवण्यात आलेल्या प्लास्टिक पाईपांना आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याने खळबळ उडाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध कामांसाठी लागणारे हे पाईप एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते. या पाईपांना भीषण आग लागल्यानंतर धूराचे लोट संपूर्ण शहरात पसरल्याचं दिसून आलं. त्यामुळे, नेमकं कुठं आणि कशाला आग लागली, याची चर्चा सोलापूर शहरात सुरू झाली होती.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ठेवण्यात आलेल्या पाईपांना यापूर्वी होम मैदान परिसरात देखील आग लागली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी हे पाईप बार्शी रोडवरील भोगाव परिसरात ठेवण्यात आले. पण, तिथेही आज पुन्हा या पाईपांना आग लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्,र आग मोठी असल्याने अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.
हेही वाचा