Solapur: सोलापुरातील लष्कर परिसरात रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. गॅस गळतीमुळे एका पाच सदस्यीय कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. या घटनेत दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

लष्कर भागातील बेडरफुलजवळ राहणाऱ्या युवराज मोहनसिंग बलरामवाले (वय 40) यांचं छोटंसं दहा बाय पाच फुटांचं घर होतं. शनिवारी रात्री कुटुंबाने जेवण करून सर्वजण नेहमीप्रमाणे झोपले. मात्र, गॅस व्यवस्थित बंद न झाल्यामुळे मध्यरात्री वायू गळती झाली. घर पूर्णपणे हवा बंद असल्याने खोलीत गॅस साचला आणि संपूर्ण कुटुंब झोपेतच बेशुद्ध झाले.

रविवारी सकाळी रंजनाबाईंसोबत काम करणाऱ्या एका महिला विडी कामगार महिला विडीच्या पत्त्यांसाठी त्यांच्या घरी गेली असता दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने तिने शेजाऱ्यांना बोलावले. दरवाजा उघडल्यावर आत संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळले. तातडीने शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी पोलिसांना कळवून सर्वांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दोन बालकांचा मृत्यू,परिसरात हळहळ

उपचारादरम्यान सहा वर्षांचा हर्ष आणि चार वर्षांची अक्षरा या दोन बालकांचा मृत्यू झाला. आई रंजना (35) आणि आजी विमल (60) यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर युवराज बलरामवाले यांच्यावरही उपचार सुरू असून त्यांचीही अवस्था गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. प्राथमिक अंदाजानुसार गॅस गळतीमुळे गुदमरून कुटुंब बेशुद्ध झालं असल्याचे समोर आलं आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून दोन चिमुकल्यांचा जीव गेला याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गरिबीच्या विळख्यात अडकलेलं कुटुंब

युवराज बलरामवाले हे गोवंडी म्हणून काम करायचे, तर पत्नी रंजना विडी कामगार म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. आई, पत्नी आणि दोन लहान मुलांसोबत एका छोट्याशा खोलीत त्यांचा संसार सुरू होता. परंतु एका छोट्याशा दुर्लक्षामुळे त्यांच्या संसारावर आभाळ कोसळलं.