सोलापूर : सध्या माढा विधानसभेची चर्चा राज्यात सर्वात जास्त सुरु आहे. शिवसेनेच्या मेळाव्यात आपण माढा विधानसभा लढणार असल्याचे थेट संकेत शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी दिल्याने महायुतीत नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाची माढा विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद असली तरी महायुतीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. अजितदादा यांच्या पक्षाचे नेते बबनदादा शिंदे हे माढ्याचे आमदार असून यंदा ते आपला मुलगा रणजितसिंह शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. मात्, रणजितसिंह शिंदे हे सातत्याने शरद पवार यांच्या भेटी घेत असल्याने ते यावेळी तुतारी कडून किंवा अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
शिवसेनेच्या मेळाव्यात हाच धागा पकडत सर्वच पदाधिकाऱ्यांनी महायुतीकडून ही जागा शिवसेनेने लढवण्याचा आग्रह करण्यात आला होता.या बैठकीला माढा विधानसभा मतदारसंघातील 136 गावातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जर शिंदे हे महायुती मधून ना लढत दुसऱ्या पक्षातून किंवा अपक्ष लढणार असतील तर माढाची पारंपरिक जागा ही शिवसेनेची असल्याने येथून शिवाजी सावंत यांनी निवडणूक लढवण्याची मागणी मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केली.
यानंतर बोलताना विधानसभेसाठी इच्छुक असणे गैर नसून माढा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने जर शिंदे हे महायुतीमधून लढणार नसतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही जागा लढवण्याचा आग्रह धरू असे, शिवाजी सावंत यांनी सांगितले. तसे झाले तर आपण माढ्यातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत सावंत यांनी दिले. शिवाजी सावंत यांचा माढा तालुक्यात मोठा गट असून गेल्यावेळीही त्यांनी उभ्या केलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला ७५ हजाराच्या आसपास मते मिळाली होती.आता जर शिंदे महायुतीत लढणार नसतील तर मी धनुष्यबाण घेऊन माढा विधानसभा लढवणार, असे सावंत यांनी सांगितल्याने माढ्यात हा नवा ट्विस्ट समोर आला आहे.
संबंधित बातम्या :