सोलापूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे (Farmers) मोठे नुकसान झाल्याचं दिसून आलं. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींचे पॅकेज देखील जाहीर केले. मात्र, अद्यापही काही गावात, काही घरांना, ग्रामस्थांना शासनाची मदत मिळालीच नाही. अनेक गावात लाडक्या बहिणींना भावाची ओवाळणी मिळालीच नाही. सीना नदीला आलेल्या महापुराचा (Flood) सर्वात जास्त फटका राहुल नगर अर्थात सुलतानपूर या गावाला बसला होता. संपूर्ण गाव पाण्याखाली गेल्याने येथे कुठल्याच मार्गाने पोहोचणे अशक्य बनले होते. संपूर्ण गाव पाण्याखाली जाऊन देखील घरांच्या नुकसानीची कोणतीही मदत अद्याप दिवाळी (Diwali) संपेपर्यंत देखील या गावापर्यंत पोहोचलेली नसल्याचे दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले. 

Continues below advertisement

गावातील ग्रामस्थ दत्तात्रय शिंदे यांचे संपूर्ण घर पाण्याखाली होते. मात्र, लाखो रुपयाचे नुकसान होऊन देखील शासनाने अद्याप एक रुपयाची मदत दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे यांचा दीड एकर ऊस जमिनीसह वाहून गेल्यानंतर पिक नुकसानीचे अकरा हजार दोनशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दुसरीकडे अशीच अवस्था नामदेव शिंदे या तरुण शेतकऱ्यांची असून त्याच्या खात्यावर देखील दीड एकर शेतीच्या नुकसानीचे पैसे जमा झाले आहेत. मात्र, घरच्या नुकसानीचे कोणतेही नुकसान भरपाई शासनाकडून आलेली नाही. यंदाची दिवाळी लोकांच्या मदतीवरच कशीतरी केल्याचे दत्तात्रय शिंदे सांगतात. त्यामुळे, शासनाच्या मदतीचा घोळ आता समोर येऊ लागला असून संपूर्ण गाव पाण्याखाली गेले होते. मात्र, दिवाळीपूर्वी मदत जाहीर करणार असल्याचे सांगत सरकारने बळीराजाला, नुकसानग्रस्ताना आश्वासन दिले. मात्र, आज भाऊबीज, दिवाळी संपत आल्यानंतर देखील घराच्या नुकसानीचे पैसे सुलतानपूरमधील गावाकऱ्यांना मिळालेले नाहीत.

महापुराने दणका दिलेल्या माढा तालुक्याच्या दारफळ येथील बोराटे वस्तीमधील लोकांनाही अद्याप शासनाची मदत मिळालेली नाही. त्यामुळे या दिवाळीला ना पोरांना नवीन कपडे मिळाले, ना फटाके, ना फराळाचे गोडधोड पदार्थ, मात्र यंदा दिवाळी नसल्याचे सांगताना या चिमूरड्यांच्या चेहऱ्यावरील दुःखही लपून राहिले नाही. दारफळ या गावी खरे तर मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती. ज्या ठिकाणी 126 लोक अडकले आणि त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर बोलवायची वेळ आली तीच ही बोराटे वस्ती. घरावर तीस फूट पाणी असलेल्या येथील अनेक लोकांना अद्याप शासनाची कसलीही मदत मिळालेली नाही. त्यामुळेच चिमूरड्यांना ना फटाके, ना नवीन कपडे न फराळाचे पदार्थ. आमच्याकडे दिवाळी नाही असे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख मात्र लपत नाही. आज दिवाळीचा शेवटचा दिवस मात्र अजूनही दारफळ मधली कुटुंब शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

Continues below advertisement

हेही वाचा

बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा; तेजप्रताप यादवांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया