BLOG : सोलापूर जिल्हा भाजपमध्ये ‘मिशन लोटस’च्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सत्तासंघर्ष उफाळून आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या संभाव्य प्रवेशाने जणू पक्षातील जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत. भाजप कार्यालयाबाहेरच पक्षातील कार्यकर्त्यांनी आंदोलन करून व्यक्त केलेली नाराजी ही केवळ ‘प्रवेश’विरोधातील प्रतिक्रिया नाही तर ती पक्षाच्या सत्ताबलाच्या बदलत्या केंद्रबिंदूविरुद्धची असंतोषाची लाट आहे.
तीन तरुणांचा वरचष्मा, दोन देशमुखांची युती
सोलापूर भाजपची परंपरागत सूत्रे आजपर्यंत दोन ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हातात होती. महापालिका असो किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका, सोलापुरातील राजकारण या दोन्ही देशमुखांच्या प्रभावाशिवाय पूर्ण होत नसे. मात्र 2019 नंतर परिस्थिती झपाट्याने बदलू लागली. अक्कलकोटचे सचिन कल्याणशेट्टी आणि माळशिरसचे राम सातपुते हे दोन तरुण आमदार फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून पुढे आले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले देवेंद्र कोठे हे आणखी एक प्रभावी तरुण चेहरे ठरले. 24 च्या निवडणुकीत राम सातपुते पराभूत झाले असले तरी सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे यांचे वाढते महत्त्व हे दोन्ही देशमुखांना खटकणारे ठरल्याचे बोलले जाते.
‘पालकमंत्री बदल’ सत्तेचा नवा केंद्रबिंदू
विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रीपदाच्या वाटपात अपेक्षित असलेले माजी मंत्री राहिलेले राहिलेले देशमुख वगळले गेले आणि पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांना मिळाले. गोरे, कल्याणशेट्टी आणि कोठे हे तिघेही तरुण, फडणवीसांच्या गोटातील आणि एकाच राजकीय प्रवाहाचे. त्यामुळे सोलापुरातील भाजपचे समीकरण पूर्णपणे बदलले. या तिघांच्या तिकडीने हळूहळू जिल्ह्यातील सत्ता आणि संघटन या दोन्हीवर पकड मिळवायला सुरुवात केली.
बाजार समिती निवडणुकीत उघड झाला संघर्ष
अलीकडील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत हा संघर्ष स्पष्ट दिसला. सुभाष देशमुख यांच्या पॅनलविरुद्ध सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासोबत हातमिळवणी केली. माने विजयी झाले आणि सभापती बनले. या निकालाने कल्याणशेट्टी किंगमेकर ठरले, तर देशमुख यांची गोटातील पकड कमकुवत झाल्याचे चित्र उभे राहिले.
आता माने यांच्या प्रवेशातून उभा झालेला वाद
बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या संपर्कात आलेले दिलीप माने यांनी अधिकृतपणे थेट भाजप प्रवेश करण्याची तयारी केलीय. तीही पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने. आमदार सुभाष देशमुख गटासाठी हे केवळ राजकीय आव्हान नाही, तर आपल्याच शत्रूला घरात स्थान देण्यासारखी बाब आहे. त्यावरूनच सुभाष देशमुख समर्थक कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन छेडले. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या समजावण्याच्या प्रयत्नांनाही कार्यकर्त्यांनी विरोध केला. राज्यभर चर्चेत आलेल्या या आंदोलनाने भाजपच्या “शिस्तबद्ध पक्षसंस्कृती”वरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
गटातटाचे राजकारण करणारे दोन देशमुख आता एकाच गटात?
सोलापूर भाजपत विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे आतापर्यंत वेगवेगळे गट असल्याचे सोलापूरकरांनी पाहिलंय. मात्र नव्या तरुण तिकडीच्या वाढत्या प्रभावामुळे आता हे दोन्ही ज्येष्ठ नेते एकत्र आल्याचे दिसतंय. दोघांच्या बैठका, एकमेकांच्या कार्यक्रमात सहभाग हे संकेत राजकीय पुनर्मिलनाचे आहेत. त्यात दिलीप माने यांचा प्रवेश केवळ सुभाष देशमुखांनाच नाही, तर विजयकुमार देशमुखांच्या राजकीय गणितालाही धक्का देणारा आहे.
‘पार्टी विथ डिफरन्स’ की ‘डिफरन्स विथिन पार्टी’?
आज सोलापूर भाजप दोन थरात विभागलेली दिसते. एकीकडे दोन्ही ज्येष्ठ देशमुख, तर दुसरीकडे जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे ही तरुण मंडळी. भाजपची ओळख “पार्टी विथ डिफरन्स” अशी सांगितली जाते. मात्र सोलापुरात जे सुरू आहे ते ‘डिफरन्स विथिन पार्टी’चं उदाहरण वाटतंय. भाजपच्या या मिशन लोटसमुळे सोलापुरात राजकीय सत्तासंतुलन पूर्णपणे बदलण्याची चिन्हं आहेत. प्रश्न एवढाच आहे या सत्तासंघर्षातून भाजप मजबूत होईल का?