सांगोला: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने तसेच नेत्यांनी मोठी तयारी केली आहे. राज्यातील स्टार आमदार अशी ओळख असणारे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हेही सध्या विधानसभा तयारीला लागले असून मुंबई आणि परिसरात कामानिमित्त झालेल्या हजारो मतदारांना भेटण्यासाठी आज त्यांनी मुंबईत एका मेळाव्याचे आयोजन केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या निसटत्या विजयाला हातभार लावणारे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनीही या वेळेला निवडणूक रिंगणात उतरायची तयारी सुरू केल्याने शहाजी बापूंच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहे. यामुळेच शहाजी बापूंनी आता मतदार संघातील जगण्यासाठी बाहेर गेलेल्या मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  
     
सांगोला ही दुष्काळी नगरी अशी ओळख असल्याने येथील अनेक नागरिक जगण्यासाठी देशभर गेलेले आहेत. सोने गाळण्याचे काम करणारे काही मतदार पश्चिम बंगाल, गुजरात, केरळ अशा विविध राज्यात गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत. अशाच पद्धतीने मायानगरी मुंबई ,उपनगरे ,नवी मुंबई, ठाणे ,पनवेल व रायगड अशा ठिकाणी दहा हजारापेक्षा जास्त सांगोलकर पूर्वीपासून राहत आहेत. या मतदारांना साद घालून आपल्या मतदारसंघात मतदानासाठी आणण्याच्या हेतूने आज शहाजी बापू पाटील यांनी कळंबोली येथे या मतदारांचे गेट-टुगेदर व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गेलेल्या बापूंनी आज दुसऱ्या दिवशी लगेच मुंबई परिसरातील आपल्या गावाकडच्या लोकांना एकत्रित करण्याचे नियोजन केले आहे. 
     
आजच माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे जगायला गेलेल्या सांगोल्यातील बांधवांचा स्नेह मेळावा व भोजनाचे आयोजन केले आहे. काही दिवसापूर्वी दीपक साळुंखे यांनी कलकत्त्यात जाऊन तेथे सांगोल्यातील नागरिकांना एकत्रित केले होते. आता शहाजी बापू पाटील हे मुंबईत आज स्नेह मेळावा घेत असताना   दीपक साळुंखे यांनीही पुण्यात आजच स्नेह मेळावा ठेवला आहे . सांगोल्याचे फिक्स आमदार अशी जाहिरात बाजी दीपक साळुंखे यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शहाजी बापूंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. सांगोल्याचा गड राखण्यासाठी शहाजी बापू आता जोमाने तयारी लागली असून या दोघांच्या वादावर शेकाप लक्ष ठेवून आहे . 
   

  
सांगोल्यात ही सर्व मंडळी जगण्यासाठी जरी मुंबईकडे गेली असली तरी त्यांनी आपल्या मातीची नाळ तुटू दिलेली नाही. याचाच फायदा घेत मुंबई परिसरातील जवळपास दहा ते बारा हजार मतदारांचा मेळावा शहाजी बापू यांनी कळंबोलीतील न्यू सुधागड विद्यालय येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी बापूंचे समर्थक गेल्या काही दिवसापासून मुंबई परिसरात असणाऱ्या सांगोल्यातील मतदारांशी संपर्क ठेवून या मेळाव्याचे नियोजन करीत आहेत. पूर्वीचा दुष्काळी सांगोला ही ओळख पुसण्याचा प्रयत्न शहाजीबापू करीत असून या काळात मोठ्या प्रमाणात सिंचनाची व रस्त्याची कामे बापूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करून घेतली आहेत. मुंबई त राहणाऱ्या या आपल्या मतदारांना सांगोल्यात सध्या काय विकास झाला आहे याची माहिती देऊन सांगोल्याला पुन्हा एकदा सोन्याचे करण्यासाठी आपल्या मागे उभे रहा असे आव्हान शहाजी बापू करणार आहेत. आज संध्याकाळी सहा वाजता कळंबोलीतील या मेळाव्यात नेमके किती मतदार येणार याकडे बापूंचे लक्ष असले तरी त्यांनी या मेळाव्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्याचवेळी दीपक साळुंखे हे देखील पुणेपिंपरी चिंचवड परिसरातील संगोल्याच्या नागरिकांना साद घालत आहेत. 
     


गेल्या निवडणुकीत अतिशय निसटता विजय मिळवलेले शहाजी बापूंना आता यावेळी आपण केलेल्या विकासाच्या जोरावर निवडून यायचे असून त्यांचे पारंपारिक विरोधक असणारे शेतकरी कामगार पक्ष याच्याशी दोन हात करताना त्यांना एक एक मताची आवश्यकता भासत आहे. सध्या शेतकरी कामगार पक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख हे दोन भाऊ उमेदवारीसाठी झगडत असून याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न शहाजीबापू करीत आहेत. मात्र शहाजी बापूंना गेल्या वेळी निवडून आणण्यात सिंहाचा वाटा असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनीही आता विधानसभेची जोरदार तयारी सुरू केल्याने शहाजीबापू प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करताना दिसत आहेत. दीपक साळुंखे यांची मोठी ताकद असून सध्या त्यांच्याकडून ठाकरे गटाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. सांगोल्यात महाविकास आघाडीचे तिकीट ठाकरे गटाला मिळाल्यास दीपक साळुंखे येथील उमेदवार असणार आहेत आणि असे झाल्यास या तिरंगी लढतीत कशा रीतीने सामोरे जायचे याचा प्रयत्न शहाजीबापू करीत आहेत. 
      
महाविकास आघाडीत सांगोल्याची जागा शेतकरी कामगार पक्षाला देण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न असला तरी सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला केवळ बार्शी ही एकमेव जागा सध्या निश्चित झाल्याचे दिसत आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून गेल्यावेळी सांगोल्याचा आमदार शिवसेनेचा असल्याने ही जागा आम्हालाच पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्यात लढत झाल्याने ठाकरेंची शिवसेना व शेकाप मध्ये फारसे सख्य नाही. अशावेळी महाविकास आघाडीतून सांगोल्याची जागा शिवसेनेला घेण्यासाठी ठाकरे गट आक्रमक बनला आहे. 


मोहोळच्या जागेवर दावा करणाऱ्या ठाकरेंना शरद पवारांनी विरोध करताना येथील आमदार गेल्यावेळी राष्ट्रवादीचा विजयी झाल्याने ही जागा शरद पवार गटांनी घेतली आहे. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे गटाने गेल्यावेळी सांगोल्याचा आमदार शिवसेनेचा असल्याने ही जागा शिवसेनेलाच राहील अशी ठाम भूमिका मांडल्याने सध्या महाविकास आघाडीत सांगोल्याच्या जागेवरून वादंग तयार झालेला आहे. याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न शहाजीबापू करीत असून दीपक साळुंखे पाटील यांनी गेल्या निवडणुकीत आपल्याला मदत केली असली तरी यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत ते शेकांबरोबर राहिले होते अशी आठवण शहाजीबापू करून देतात. 


सध्या तरी तिरंगी लढत झाल्यास शहाजी बापूंना विजय मिळवण्यासाठी मतदारसंघातील जगण्यासाठी बाहेर गावी असलेल्या मतदारांना आपल्याकडे वळवणे हा सर्वात चांगला पर्याय दिसत आहे. त्यामुळेच शहाजी बापू यांनी आज मुंबईत सांगोल्यातील मतदारांसाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. सोन्याच्या सांगोल्याची सोनेरी माणसे असे संबोधत या स्नेहबंधन मेळाव्याचे गणित बापू घालत आहेत . तर दीपक साळुंखे हे देखील शहजिबापूना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याचा कितपत फायदा शहजिबापू व दीपक साळुंखे त्यांना होणार हे पुढील काळात निश्चित होणार असले तरी सांगोल्यात संभाव्य तिरंगी लढतीत संगोळ्याचा गड राखणे ही बापुंसाठी अग्नीपरिक्षा असेल .