सोलापूर: सहाच महिन्यांपूर्वी एकमेकांवर टीका करणारे, एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवणारे सोलापूर जिल्ह्यातील नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात एकाच स्टेजवर दिसले. ज्येष्ठ स्वर्गीय नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्या कार्यक्रमाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक खासदार आणि चार आमदारांनी हजेरी लावली. सोबत ठाकरे गटाच्या एका आमदाराही स्टेजवर दिसला.
श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखान्याच्या आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वर्गीय नेते सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं.
Sudhakar Paricharak Statue : कै. सुधाकरपंत परिचारक यांच्यासाठी एकत्र
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे सर्व आजी-माजी आमदार आणि नेते एकाच स्टेजवर पाहायला मिळाले. काही दिवसांनी येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत पुन्हा एकदा हे विरोधक एकमेकांवर टोकाची टीका करताना पाहायला मिळणार असले तरी केवळ स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्यावरील प्रेमामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सर्व कट्टर विरोधक एकत्र बसल्याचे चित्र समोर आले.
Solapur News : कोण-कोण उपस्थित
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळचे आमदार राजू खरे आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे उपस्थित होते.
त्याचसोबत सोबत शिवसेना ठाकरे गटाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल, सांगोल्याचे शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, भाजपचे पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे आणि विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे उपस्थित होते.
Solapur Politics : एकमेकांचे कट्टर विरोधक एकाच स्टेजवर
एकमेकांच्या विरोधात लढलेले आणि कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे सर्वच नेते मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात एकाच स्टेजवर उपस्थित होते. बार्शीचे राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल, सांगोल्याचे शहाजी बापू पाटील आणि डॉ. बाबासाहेब देशमुख, करमाळ्याचे संजय मामा शिंदे आणि नारायणा पाटील, मोहोळचे राजन पाटील आणि राजू खरे, माळशिरसचे राम सातपुते आणि उत्तम जानकर हे सर्व आजी-माजी आमदार एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. तरी परिचारकांसाठी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र स्टेजवर आल्याचे दिसून आले.
वास्तविक स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी अनेक वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात सर्वच पक्षाच्या नेत्यांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध जोपासले होते. त्यामुळे माजी आमदार आणि स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांनी ऐनवेळी दिलेल्या निरोपानंतरही हे कट्टर विरोधक एकत्र आले हे विशेष.