सोलापूर : शरद पवारांची साथ सोडून फडणवीसांच्या गोटात सामील झालेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे जरी फडणवीसांच्या स्टेजवर दिसत असले तरी त्यांच्या दोन्ही मुलांनी थेट तुतारीकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिल्याने भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. लक्ष्मण ढोबळे हे पवारांसोबत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक वर्ष मंत्री म्हणून दिसले होते. राज्यात सत्तांतर झाल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना साथ देत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर भाजपने त्यांना म्हणावा असा न्याय तर दिलाच नाही मात्र पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती केल्याने हा फायर ब्रँड नेताही अडगळीत पडला होता.


ढोबळे यांचा वापर भाजपने शरद पवार आणि त्यांच्या गटावर टीका करण्यासाठी करून घेतला होता आणि त्यामुळेच त्यांना प्रवक्ते पद ही देण्यात आले होते. सध्यातरी ढोबळे यांनी अजूनही भाजपवर निष्ठा ठेवत काम सुरू ठेवले असले तरी त्यांची कन्या कोमल आणि मुलगा अभिजीत यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यासोबत न राहता शरद पवार यांना साथ देणे पसंत केले आहे. काल पुणे येथे झालेल्या शरद पवार गटाच्या मुलाखतीत भाग घेत फडणवीसांपेक्षा पवार चांगले हे दाखवून दिले आहे. 


राजकीय घडामोडींना वेग


ढोबळे यांची कन्या कोमल व शाहू सूतगिरणीचे अध्यक्ष असलेले त्यांचे पुत्र अभिजीत यांनी माळशिरस व मोहोळ या दोन राखीव मतदार संघासाठी मुलाखती दिलेल्या आहेत. सध्या मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने हे आमदार असून त्यांच्या विरोधात भाजपमधून पवार गटाकडे गेलेले संजय क्षिरसागर हे प्रमुख चर्चेतले उमेदवार आहेत. याशिवाय मोहोळचे माजी आमदार रमेश कदम, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजू खरे यांनीही मोहोळसाठी मुलाखती दिली असल्या तरी ढोबळे यांच्या दोन्ही मुलांनी दिलेल्या मुलाखतीमुळे राजकीय घडामोडी वेगाने घडू लागले आहेत. 


कोमल ढोबळे यांनी मुलाखत दिल्याने चर्चांना जोर


कोमल ढोबळे या भाजपवर नाराज होत्या आणि त्या पक्ष बदलणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. सुरुवातीला त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करणार असे वातावरण बनले असताना आता कोमल ढोबळे यांनी थेट तुतारीकडे उमेदवारीसाठी मागणी करीत मुलाखत दिल्याने चर्चेला जोर आलेला आहे. कोमल यांचे बंधू अभिजीत यानेही मोहोळ व माळशिरस या दोन मतदारसंघासाठी मुलाखत दिली आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त उमेदवारीची मागणी ही शरद पवार यांच्या तुतारीकडे होऊ लागल्याने पवारांची जादू वाढत चालल्याचे दिसत आहे. याबाबत अजून लक्ष्मण ढोबळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी ढोबळ्यांची मुलं मात्र तुतरीचाच प्रचार करणार हे दिसू लागले आहे.


हे ही वाचा :


फडणवीस मतदारसंघात मात्र भाजपचा माजी आमदाराची दांडी; गडी थेट सोलापुरात उगवला, अजितदादांच्या शेजारी बसून केली चर्चा, नक्की काय घडलं?