सोलापूर : मी आयुष्यभर लोकात राहून काम केलं आणि त्यामुळेच तुम्ही मला आजवर सहा वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी केले. आता यंदाच्या निवडणुकीत माझ्याऐवजी मुलगा रणजीत भैय्याला संधी द्या असं आवाहन माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी केलंय. बबन शिंदे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत. बबन शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर ते माढा विधानसभेच्या रिंगणात नसतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे. 


आमदार बबन शिंदे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजितदादांसोबत जाणे पसंत केले. लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा बबन शिंदे घरवापसीच्या तयारीत असल्याची चर्चा असून वारंवार ते शरद पवार यांची भेट घेत आहेत. शुक्रवारी पंढरपूर तालुक्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आमदार शिंदे यांनी पहिल्यांदाच थेट मुलाला निवडणुकीत उतरवणार असल्याचे जाहीर केले. 


एकदा संधी द्या, मग नंतर ठरवा


भविष्यात सर्व नवीन पिढी विधानसभेत जात असताना तुम्ही रणजीत भैय्याला एक संधी द्यावी अशी विनंती आमदार बबन शिंदे यांनी मतदारांना केली. बबन शिंदे म्हणाले की, पंढरपूर तालुक्यातील 42 गावे ही माढा विधानसभा मतदारसंघात असून आपण या भागात खूप काम केले आहे. मला तुम्ही प्रत्येक वेळेला भरभरून मताधिक्य देऊन विजयी केले. तशी एक संधी आमच्या रणजीत भैय्यालाही द्या. तो कसे काम करतो हे पाहा. जर तुम्हाला काम नाही आवडलं तर पुढच्या वेळी मत द्यायचं की नाही ते ठरवा. मात्र या वेळेला भैय्याच्या पाठीमागे उभे राहा.


आमदार बबन शिंदे म्हणाले की, कामाच्या माणसालाच निवडून देणे गरजेचे असून प्रत्येक वेळी माझ्याकडून जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न मी केला आहे. गरिबातला गरीब माणूस जरी दिसला तरी मी गाडी थांबून बोलतो. अशाच पद्धतीने रणजीत भैय्याही काम करेल. जनता हीच माझी ताकद आहे आणि त्यामुळेच तुम्ही माझ्याप्रमाणे भैय्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.


लोकसभेच्या पराभवानंतर सोलापूर जिल्ह्यात अनेक दिग्गज महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचं दिसतंय. प्रत्येक जण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे पळताना दिसत आहे. त्यामुळे आता माढ्यातून आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे हे घड्याळ सोडून तुतारी हाती घेणार का हे पहावं लागेल. मात्र माढ्यातून रणजीत शिंदे यांना तुतारी न मिळाल्यास ते महायुतीतून न लढता अपक्ष लढतील अशी चर्चा आहे.


ही बातमी वाचा: