CM Eknath Shinde: पारंपरिक शेतीबरोबरच नवनवीन, अत्याधुनिक शेतीतून उत्पादन घेतल्यास बळीराजा समृद्ध होईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. मनात आणले तर शेतकरी काहीही करु शकतो असेही ते म्हणाले. आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्याच्या कृषी विभागानं पंढरपुरात (pandharpur) 'कृषीपंढरी व तृण धान्य' महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
कृषी प्रदर्शनात मिळाली नाविन्यपूर्ण पद्धतीनं पिकवलेल्या पिकांची माहिती
शेतकऱ्यांनी काळ्या आईची सेवा करून नाविन्यपूर्ण पद्धतीने पिकवलेली पिके आणि त्यांचे अनुभव जाणून घेण्याची संधी मला मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वारीच्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या या कृषी प्रदर्शनात शेती उत्पादनाच्या विविध जाती प्रजाती पहायला मिळाल्या. या प्रदर्शनात फिरताना एका तरुण शेतकऱ्याने पाच एकरात तब्बल 1.20 कोटी रुपयांचे आल्याचे उत्पादन घेतलेले पाहिले. त्यामुळं मनात आणले तर शेतकरी काहीही करु शकतो असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांनी नवनवीन गोष्टी शिकून आपलं शेतशिवार फुलवावं
शासनाने बळीराजासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय आहे. तसेच शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे राज्य शासनही प्रतिवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीला मदत करणे असे अनेक निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पंढरपुरात हे प्रदर्शन वारीनिमित्त भरवण्याला एक वेगळे महत्त्व आहे. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांनी नवनवीन गोष्टी शिकून आपले शेतशिवार फुलवावे. तसे झाल्यास राज्यातील शेतकरी सुखी संपन्न होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार भरत गोगावले, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारीनिमित्त आलेले हजारो शेतकरी उपस्थित होते.
सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवूनच सरकारचे सर्व निर्णय
राज्यात आपले सरकार आल्यामुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवूनच आजवर सर्व निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील 12 कोटी जनतेला महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सरसकट पाच लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशिष्ट रंगाच्या रेशन कार्डाचा निकष देखील रद्द करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: