Solapur News: उजनी धरणाच्या (Ujjani Dam) इतिहासात पहिल्यांदाच धरण यंदा जून महिन्यातच 50 टक्केच्या पुढे भरले असून धरणात सध्या जवळपास 91 टीएमसी पाणीसाठा जमा झालेला आहे. यावर्षी मान्सून पूर्व पावसाने घातलेल्या धुमाकूळामुळे उजनी धरण वजा 23 टक्क्यातून आधीक 50% असा प्रवास केवळ 30 दिवसात पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी उजनी धरण 3 ऑक्टोबरला पन्नास टक्के भरले होते. यावर्षी मात्र 17 जून रोजी 50% ची पातळी धरणाने ओलांडली आहे.
सध्या पुन्हा एकदा मान्सूनच्या आगमनानंतर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणात 14 हजार 642 क्युसिक विसर्गाने पाणी जमा होत आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढच्या पंधरा दिवसात उजनी धरण 100% भरण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा उजनी धरणा मुळे महापुराची शक्यता तज्ञांकडून वर्तविले जात आहे.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांची वाढ
दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस कोसळला असून पाणी टंचाईचे संकट मिटले आहे. अशातच, कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात रात्रीपासून पावसाची उघडीप आहे. मात्र गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांची वाढ झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचांवर पोहचली असून राजारामसह 18 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा साठा असल्याने भविष्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेता धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राधानगरी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 2500 क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. तर कुंभी धरणातून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे. पर्यायाने पंचगंगा नदीपात्रात पाण्याची मोठी आवक होत असल्याने गेल्या 24 तासात पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.
रायगड जिल्ह्यातले नऊ धरण 100% भरले
दरम्यान, घटप्रभा मध्यम प्रकल्प 100% भरला असून सांडव्यावरून 300 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिकडे रायगड जिल्ह्यात मध्य रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. विश्रांती घेतलेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या आंबा आणि कुंडलिका नद्यांची पातळी पुन्हा सुरक्षित पातळीपर्यंत पोहचली आहे. मात्र नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून रायगड जिल्ह्यातले नऊ धरण 100% भरले आहे. यात सुतारवाडी,उन्हेरे , पाभरे , संदेरी, खिंडवाडी, भिलवले, कोंडगाव, कोथुर्डे आणि खैरे धरणांचा समावेश.
भंडाऱ्यात हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानं भंडारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तविला आहे. सोसाट्याचा वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह कुठं हलक्या, कुठं मध्यम तर कुठं तीव्र स्वरूपाचा हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुढील चार दिवस येलो अलर्ट हवामान विभागानं वर्तविला आहे.
हे ही वाचा