मुंबई : मान्सूनने कोकणाचा संपूर्ण भाग व्यापला असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग मान्सूनची एन्ट्री झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास चारही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचसोबत संपूर्ण कोकणमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पुढील दोन ते तीन दिवस मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे असून अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, घाट परिसरातून जाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट असून काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती, गोंदिया, भंडारा आणि नागपुरात देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सातारा आणि पुण्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे
Mumbai Rain News Update : मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये रेड अलर्ट
मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कोकणातील काही भागात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात परिसरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Mumbai Rain News : मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं, अंधेरी सब वे पाण्याखाली
मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. अंधेरी सब वे पाण्याखाली गेला असून त्या ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच मुंबईतील अनेक रेल्वे पटऱ्यांवर पाणी साचल्याने लोकल वाहतून मंदावली आहे.
पवई, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावर भांडुप जवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी भरल्याने वाहतूक मंदावली आहे.
Ratnagiri Rain : रत्नागिरीत सोमेश्वर मंदिर पाण्यात गेलं
रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. रविवारी रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीला पूर आला असून राजवाडी गावातील सोमेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर फणसवणे, कळंबस्ते, नायरी, शृंगारपूर या गावांचा गावांचा संपर्क तुटला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात गेली वाहून गेली आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती वर्तवण्यात येते. परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून परशुराम घाटातील समस्येवर उपाययोजना करण्यात करण्याची मागणी करण्यात येते आहे.
राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. अर्जुना आणि कोदवली या नदीच्या संगमावरती असलेल्या राजापूर शहरातला जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी आलं आहे. मागच्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात समुद्राला उधाण, 15-20 गावांचा संपर्क तुटला
सिंधुदुर्गात पावसाच्या सरी कोसळत आहेत. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली आचरा राज्य मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला असून पर्यायी मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.
सिंधुदुर्गात समुद्राला उधाण आलं असून किनाऱ्यावर 3 ते 3.5 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे. होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. तर तेरेखोल नदी पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Kolhapur Rain Update : कोल्हापुरात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापुरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 17 फूट 10 इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून प्रतिसेकंद 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. तर कुंभी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून प्रतिसेकंद 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेच्या नदी पात्रात पाण्याची मोठी आवक होत आहे. भोगावती, पंचगंगा आणि कुंभी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.