सोलापूर : चिकाटी, जिद्द आणि परिश्रमाची जोड असल्यास कोणत्याही परिस्थितीत सर्वकाही शक्य आहे असे म्हटले जाते. त्याचीच प्रचिती आज आली आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील असलेल्या तोळणूर या छोटाशा गावातील मुलीने घवघवीत यश संपादन केलं आहे. आयेशा पिरजादे असे या मुलीचे नाव आहे. आयेशा ही अवघ्या 24 वर्षाची आहे. इतक्या कमी वयात न्यायाधीश बनणारी ती जिल्ह्यातील पहिलीच मुलगी आहे.


अक्कलकोट शहरापासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर तोळणूर हे गाव आहे. गावापासून कर्नाटक सीमा अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने गावात भाषेची अडचण. गावात फक्त 10 पर्यंतचीच शिक्षणाची सोय. त्यामुळे उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं. मात्र जिद्द न सोडता आयेशाने सोलापुरातील दयानंद विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. चार वर्ष विधीचं शिक्षण घेतल्यानंतर तिने पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा उत्तीर्ण केली आहे. राज्यभरातून जवळपास 15 हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. मात्र अंतिम यादीत फक्त 190 विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

आयेशा पिरजादेचे वडील अजीजपाशा पिरजादे हे अल्प भू धारक शेतकरी आहेत. गावात असलेली शेती हेच अर्थाजनाचे साधन आहे. त्यांना पाच मुली. मात्र परिस्थिती नसतानाही त्यांनी आपल्या मुलींना शिक्षणापासून दूर जाऊ दिले नाही. पाचपैकी चार मुली ह्या उच्चशिक्षित झाल्या आहेत. त्यांची पाचवी मुलगी देखील शालेय शिक्षण घेत आहेत. सततच्या पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतीत ही उत्पन्न नाही. कुटुंबाची बिकट परिस्थिती असताना ही मुलींचं शिक्षण पूर्ण करण्याकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही.

याच परिश्रमाच्या जोरावर त्यांनी आयेशाला देखील शिकवले. या कष्टाचं फलित आज झालं. या यशानंतर संपूर्ण परिवार आनंदात आहे. परिवारासह आयेशाला देखील आनंदाश्रू अनावर झाले. 'मुस्लीम परिवारांमध्ये सहसा मुलींना शिक्षणासाठी प्रेरीत केलं जात नाही. मात्र वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले.', अशी प्रतिक्रिया आयेशाने एबीपी माझाशी बोलताना दिली. तर मुलींना दुय्यम स्थानी समजणाऱ्या लोकांसाठी हे यश दिशा देणारे आहे. पाच मुली असताना देखील त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने त्यांनी हे यश आज दिसत आहे. फक्त कुटुंबातीलच नाही तर गावातील पहिली न्यायाधीश मुलगी झाल्याने अतिशय आनंदी असल्याचे मत आयेशा हिचे वडील अजीजपाशा पिरजादे यांनी व्यक्त केलं. दरम्यान महाराष्ट्र राज्य लोकसेवा तर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत जवळपास 190 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई येथे प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हास्तरावर न्यायाधीश म्हणून सर्वांची नियुक्ती केली जाईल. आयेशाच्या या यशाने तिच्या नातेवाईकांसह गावात देखील आनंदाला उधाण आले आहे.