सिंधुदुर्ग : अभिनेता अतुल कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेला वळू (Valu) चित्रपटाच्या माध्यमातून गावातील वळूमुळे ग्रामस्थांना होत असलेला त्रास आणि तो वळू पकडण्यापर्यंतची सर्व उठाठेव 70 मिमि पडद्यावर झळकली आहे. ग्रामीण भागात आजही वळू म्हणजेच देवाच्या नावाने सोडलेला बैल गावकऱ्यांसाठी कधी कधी त्रासदायक ठरतो. मात्र, जंगली रेडा म्हणजेच रानगव्याच्या त्रासामुळे गावकरी त्रस्त झाले असून वन विभागाकडे त्यांनी धाव घेतल्यां दिसून येत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात देवगड तालुक्यातील फणसगाव, दारुम भागात गवारेड्यांचा मुक्त संचार मागील काही दिवसांपासून सुरू असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरगाव, कुवळे,चाफेड नंतर आता फणसगाव, दारुममध्ये देखील गवारेड्यांचा मुक्त संचार होऊ लागल्यामुळे सध्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फणसगाव येथे दोन गवे गावात जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर वावरताना मोबाईलमध्ये कैद झाले आहेत. येथील वन परिसरातील रानगवा मानवी वस्तीत येऊन ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत करताना दिसून येत आहे. गावातील शेतकऱ्यांच्या शेतात धुडगूस घालून कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांचं नुकसान होत आहे. सध्या आंब्याचा हंगाम असल्याने गव्यांच्या भीतीने गावातील लोक आपल्या आंबा बागेत जायलाही घाबरत आहेत. वनविभागाने तात्काळ या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.


दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पुणे शहरातही रानगव्याचा वावर दिसून आला होता. त्यामुळे, पुणेकरांनीही रानगवा पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, मानवी वस्तीत रानगवा आल्यानंतर पुणेकरांचीही धांदल उडाली होती. अखेर, वन विभागाने मोठ्या कसरतीने येथील रानगव्याला पकडून जंगलात सोडून दिले होते. आता, सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनीही वन विभागाकडे रानगव्यांना पकडून नेण्याची मागणी केली आहे.  


सिंधुदुर्गात पावसाने 140 घरांचे नुकसान


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊसासह चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे कणकवली तालुक्यात 140 घरांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये 10 सार्वजनिक इमारती तर सर्वाधिक घरांचे नुकसान हरकुळ बुद्रुक आणि हळवल गावांमध्ये झाले आहे. महावितरणच्या मुख्य वाहिनीचे 78, अंतर्गत वाहिन्यांचे 42 असे 120 खांब तुटले आहेत. घरे, सार्वजनिक इमारती आणि महावितरणचे मिळून सुमारे सव्वा कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी व्यक्त केला आहे. हरकुळ बुद्रुक आणि हळवल गावांना भेट देत नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्तांशी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी संवाद साधला.


हेही वाचा


Kiran Samant : मला खासदार बनवायला महायुती सक्षम, राजन साळवी शिंदेंसोबत आले नाहीत तर त्यांच्याविरोधात मीच निवडणूक लढवणार; किरण सामंत यांचा इशारा