Vaibhav Naik On Nitesh Rane :  आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना आता दुसरीकडे राजकीय प्रत्यारोप होऊ लागले आहेत. कोकणातही निवडणुकीपूर्वीच आरोप-टीकास्त्र सोडले जात आहे. . नारायण राणे (Narayan Rane) आणि उदय सामंत (Uday Samant) हे दोघे आपल्या सोयीनुसार वेगवेगळी मंगळसूत्र बांधतात अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली. 


माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. नारायण राणेंना शिवसेनेने मुख्यमंत्री केलं. सायकल चोरी करणाऱ्यांनाही शिवसेनेमुळे मानाची पद मिळाली असून ते मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरू लागले असल्याचे नाईक यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वर आमची निष्ठा असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत असेही त्यांनी म्हटले. 


नाईक यांनी म्हटले की, आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचं अस्तित्व काय आहे हे नितेश राणेंनी सांगितलं. या मतदारसंघात शिंदे गटाला कधीही उमेदवारी मिळणार नाही. तर दीपक केसरकर आणि उदय सामंत येणाऱ्या निवडणूकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील असा दावा त्यांनी केला. 


नितेश राणेंनी काय म्हटले?


रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपने दावा केला आहे. या जागेवरून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. नितेश राणे यांनी म्हटले की, 13 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. ती जागा शिंदे गट लढवणार आहे. मात्र, सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघावर कोणाचाही दावा नाही. ज्याची ताकत जास्त आहे. त्यालाच ती जागा मिळेल असे राणे यांनी म्हटले. या मतदारसंघात भाजपची 7 लाख मते असल्याचे त्यांनी म्हटले. 


रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा (BJP) डोळा आहे. भाजप रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आले आहे. तर शिवसेनेकडून किरण सामंत (Kiran Samant)  यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांनी आदेश दिल्याचे वृत्त आहे. 


रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहे . शिवाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील देखील आहेत.  कोकणतील जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्याकडे आल्यास अगदी जुने - जाणते कार्यकर्ते देखील एकदिलानं काम करतील असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे.