सिंधुदुर्ग : कुडाळ येथील हत्येच्या घटनेने वातावरण तापले असतानाच कणकवलीतील सावडाव येथील मारहाणीच्या घटनेने सिंधुदुर्गात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचायमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नयना सावंत आणि वैभव सावंत यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण सावडाव ग्रामपंचायत उपसरपंच दत्ताराम काटे आणि त्यांच्या सहकार्यांनी केली असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik Facebook Post) यांनी केला आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करून हा आरोप केला आहे. 

नयना सावंत आणि वैभव सावंत यांना जबर मारहाण करण्यात आल्यानंतरचे फोटो वैभव नाईक यांनी शेअर केले आहेत. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची बीडच्या दिशेने वाटचाल होईल असं वैभव नाईक यांनी म्हटलं.  

या प्रकरणी कणकवली पोलिसांनी दत्ताराम काटे आणि इतर सात जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

Vaibhav Naik Facebook Post : काय म्हटलंय वैभव नाईक यांनी? 

सिंधुदुर्गचा बीड करण्याचा राणे समर्थकांचा आणखी एक प्रयत्न
 
कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचायत मधील विकास कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून सावडाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नयना सावंत व वैभव सावंत यांना भाजपचे माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच आणि राणेसमर्थक दत्ताराम काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अमानुषपणे मारहाण केली तसेच नयना सावंत यांच्या अंगावरील जॅकेट जबरदस्तीने काढले व जॅकेटच्या आत असलेले टी-शर्ट काढण्याचा प्रयत्न करून त्यांचा विनयभंग केला व त्यांना जबर मारहाण केली आहे. तसेच नयना सावंत यांना मनात लज्जा होईल अशी अश्लील वक्तव्ये, शिवीगाळ व धमकी दत्ताराम काटे यांच्याकडून देण्यात आली.आणि वैभव सावंत यांच्या गुप्तांगावर धारधार शस्त्राने जखम करण्यात आली आहे.
 
या अमानुष मारहाणीमुळे आजही नयना सावंत व वैभव सावंत हे ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र अमानुष मारहाण व विनयभंगाचा गुन्हा घडूनही अद्यापपर्यंत कणकवली पोलिसांनी या आरोपींविरुद्ध कारवाई केलेली नाही. सत्तेत आल्यामुळे राणे समर्थकांची पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग याची दखल घेणार का?