सिंधुदुर्ग : रोणपाल आणि सोनुर्लीच्या सीमेवर असलेल्या जंगलात दोन दिवसांपासून एका महिलेचा आवाज ऐकू येत होता, पण वादळामुळे त्या ठिकाणी जाता आले नाही. तिसऱ्या दिवशी मात्र जंगलात गेल्यानंतर एका झाडाला विदेशी महिलेला बांधल्याचं समोर आलं अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. सिंधुदुर्गच्या जंगलात एक विदेशी महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याचं प्रकरण (Sindhudurg Foreign Woman News) समोर आलं होतं. या प्रकरणात पोलिस तपास करत आहेत.
महिलेला साखळदंडाने बांधून ठेवलं होतं
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, दोन दिवसांपासून रोणपालच्या जंगलात एका महिलेला ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. पण वादळाची स्थिती असल्याने त्या ठिकाणी जाता येत नव्हतं. तिसऱ्या दिवशी म्हणजे 27 जुलै रोजी काही नागरिक मात्र गुराख्यांच्या मदतीने आवाजाच्या दिशेने गेले. त्या ठिकाणी एका महिलेला साखळदंडात बांधल्याचं दिसून आलं. याची माहिती गावचे संरपंच आणि पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेची सुटका केली आणि तिला रुग्णालयात नेलं.
सध्या या महिलेवर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या पतीनेच आपल्याला जंगलात बांधून ठेवल्याचा आरोप या महिलेने केला आहे. ही महिला मूळची अमेरिकेची असून गेल्या 10 वर्षांपासून ती तामिळनाडूमध्ये राहत होती.
महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
महिलेच्या जबाबावरुन तिच्या पतीविरोधात बांदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेसोबत घडलेल्या या घटनेची गंभीर दखल अमेरिकन दूतावासाने घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची दखल घेतल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे जोमाने फिरविण्यास सुरुवात केली आहे.
सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीमधील सोनुर्ली रोणापाल येथील जंगलात एक विदेशी महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे ही घटना उघडकीस आली. या महिलेची सुटका करण्यात आली असून तिच्यावर गोव्यात बांबोळीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांची पथकं तामिळनाडू आणि गोव्याला रवाना
दरम्यान पोलीस तपासात महिलेजवळ मोबाईल आणि टॅब तसंच 31 हजार रुपये रोख सापडले आहेत. पोलिस मोबाईच्या मदतीने अधिक तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंधुदुर्ग पोलिसांची एक टीम तमिळनाडू येथे तर दुसरी टीम गोव्यात रवाना करण्यात आली आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे गोव्यात देखील याचा तपास केला जाईल. तर महिला गेल्या दहा वर्षापासून तमिळनाडूत वास्तव्यास असल्याने तिथेही तपासाच्या दृष्टीने पोलिस दाखल झाले आहेत.
ही बातमी वाचा: