सिंधुदुर्ग : आजची जिल्हा नियोजन बैठक चांगलीच वादळी ठरली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात बैठकीच्या सुरवातीलाच शाब्दिक बाचाबाची झाली. सभेच्या सुरुवातीलाच जिल्हा नियोजनची सभा कोण चालवतं असा प्रश्न खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला. त्यानंतर नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात बाचाबाची झाली. 


जिल्हा नियोजन समितीची सभा सुरू होताच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा नियोजनाची सभा कोण चालवतंय असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नियोजन बैठकीत सभेच्या अजेंड्यावर असलेले विषय घेऊन बैठक घ्यावी असं म्हटलं. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांनीही माध्यमांशी बोलताना एकमेकांवर टीका केली. तर विनायक राऊत माध्यमांशी बोलताना भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली.


केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील शाब्दिक चकमकीवर माध्यमांना विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत विनायक राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना राऊत यांनी हे गतिमान सरकार नसून स्थगिती सरकार असल्याचा आरोप देखील केला. पालकमंत्री सभेचे अध्यक्ष असताना केंद्रीय मंत्र्यांनी जी लुडबूड केली ती दुर्दैवी असल्याचं विनायक राऊत म्हणाले.


कोणता विषय कधी घ्यावा हे विनायक राऊत यांना समजत नाही, हे त्यांचे अज्ञान आहे असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. मी असताना विनायक राऊत सुरवात करू शकतात का असा सवाल उपस्थित करत, अजित पवार यांनी थापा मारण्याचे काम मीडिया समोर केले आहे, ते आपण ऐकले आहे, त्यासाठी विशेष पत्रकार परिषद घेऊ असेही नारायण राणे म्हणाले.


नारायण राणे म्हणाले की, "आमच्याकडे आता 160 आमदार आहोत, त्याचे 145 कसे होणार. अजित पवार यांनी नेमका कोणता अभ्यास करून हे सरकार पडेल असे वक्तव्य केले. हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल आणि पुढच्या वेळी हेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील."


माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "विनायक राऊत हे 2024 ला खासदार नसतील. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत आपण मोठा त्याग केला. महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा म्हणून जीवाचे रान केले. आपल्याला अनेक पक्षाकडून उमेदवारीसाठी संधी देण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका नको म्हणून मी मोठा त्याग केला. आघाडीचा उमेदवार निवडून यावा म्हणून आपण प्रयत्न केला. मात्र आपण काहीच केलं नाही असं पक्ष नेतृत्वाला भासवणारे विनायक राऊत हे जिथे जातात तिथे असेच करतात. ते शिवसेना संपवणारे नेते आहेत. त्यामध्ये आमच्या विषयी गैरसमज पसरवणारे विनायक राऊत हे एक आहेत. ज्या ठिकाणी निवडणूक असेल त्या ठिकाणी विनायक राऊत जातात. भरघोस निधी आणतात आणि तो परत बॅग भरून आपल्या गावी नेतात, असे काम हे विनायक राऊत करत आहेत. त्यांचा 2024 ला पराभव निश्चित आहे. विनायक राऊत यांच्या विरोधात प्रचाराला येण्याची गरज नाही, मात्र पक्षाने आदेश दिला तर नक्की येऊ."