Sindhudurg News : कोकणात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं आता अतुल रावराणे कोणत्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा देखील सुरु झाली आहे.
उबाठा शिवसेनेत या आधी विनायक राऊत यांच्यावर नाराज असल्याचं राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना भेटून खदखद व्यक्त केली होती. आता त्या पाठोपाठ कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी माजी आमदार वैभव नाईक गटबाजीचे राजकारण करत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला विश्वासात न घेता काम केल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी वैभव नाईक यांच्या पत्रातून केला आहे.
मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक : दलवाई
मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. मराठीचा मुद्दा सोडून शिवसेनेनं हिंदुत्व स्वीकारलं आणि RSS ला मदत केल्याचे दलवाई म्हणाले. शिवसेनेच्या त्या चुकीमुळं मुंबईची गुजरातीकरण होत आहे. शिवसेनेनं मराठीचा मुद्दा पुन्हा हातात घ्यावा असेही दलवाई म्हणाले. शिवसेनेच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रावर हे संकट आलं आहे, असं म्हणत हुसेन दलवाई यांनी शिवसेनेवर टीका केली. मुंबईत मराठी माणसावर अन्याय होत असल्याचे हुसेन दलवाई म्हणाले.
ऐकेकाळी कोकणात शिवसेनेची मोठी ताकद होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात अनेक नेत्यांची जडण घडण कोकणात झाली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना धक्का दिल्यानं शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर दोन शिवसेना झाल्या. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर हळूहळू कोकणातील ठाकरे गटाची ताकद कमी होत गेली. अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटत प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे हे सत्तेत सहभागी झाल्यानं अनेकजण त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला, विनायक राऊत यांचा देखील पराभव झाला आणि रायगड लोकसभा मतदारसंघून अनंत गीते यांचा देखील परभाव झाला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील ठाकरे गटासह महायुतीला मोठा दणका बसला आहे. भास्कर जाधव सोडले तर कोकणात ठाकरे गटाचा एकही आमदार निवडूण आला नाही.