सिंधुदुर्ग : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या (Malvan Shivaji Maharaj Statue) चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सरकारने कितीही दावा केला असला तरी चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Continues below advertisement


मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्या  चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली. त्या ठिकाणची जमीन खचल्याने मोठं भगदाड पडल्याचं समोर आलं. या संबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


Rajkot Shivaji Maharaj Statue : महिन्याभरातच चबुतऱ्याची जमीन खचली


मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या आधी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण त्या पुतळ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने तो 40 फुटांचा भव्य पुतळा 26 ऑगस्ट 2024 कोसळला. त्यावरून मोठं राजकारणही झालं. त्यानंतर महायुतीच्या सरकारने पुन्हा गाजावाजा करत मूळच्या ठिकाणी नवीन पुतळा बसवला. हातातल्या तलवारीसह या पुतळ्याची एकूण उंची 83 फूट इतकी आहे. तसेच पुतळ्याच्या चबुतराची उंची 10 फूट इतकी आहे.


राजकोटवरील नव्या पुतळ्याचे अनावरण मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. आता महिनाभरातच या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली आहे.  त्यामुळे पुतळ्याला लागूनच असलेली जमीन काही प्रमाणात खचल्याचं दिसून आलं. या संबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. 


Malvan Shivaji Maharaj Statue : महाराजांचा पुतळा सुरक्षित


शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्याच्या चबुतऱ्याची बाजूची जमीन खचली आहे. पण महाराजांचा पुतळा सुरक्षित आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोणताही धोका नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. 


या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला पुतळा कोसळला होता. त्यानंतर वर्षभराच्या आत त्याच ठिकाणी नवीन पुतळा उभा करण्यात आला. मे महिन्यात या पुतळ्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन आता खचली आहे. 


Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची वैशिष्ट्ये


सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्ध समयी बाजात म्हणजेच योद्धा भूमिकेत (warrior pose) असलेल्या तलवारधारी 60 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे.
तलवारीसह पुतळ्याची एकूण उंची 83 फूट इतकी आहे. तसेच पुतळ्याच्या चबुतराची उंची 10 फूट इतकी आहे.
जमीन पातळीपासून या पुतळ्याची एकूण उंची 93 फुट इतकी आहे.
पुतळा उभारण्यासाठी ब्राँझ धातूचा उपयोग करण्यात आला असुन यामध्ये 88% तांबे, 4% जस्त व 8% कथिल धातूचा समावेश आहे.
पुतळ्यासाठी सरासरी 6 ते 8 मिलिमीटर जाडीचे कांस्य वापरण्यात आले आहे.
या कामासाठी DUPLEX स्टेनलेस स्टीलचे सपोर्ट फ्रेमवर्क, स्टेनलेस स्टील SS 316 दर्जाचे सळई असे गंजरोधक बांधकाम साहित्य वापरण्यात आले आहे.
चबुतरासाठी उच्च दर्जाचे काँक्रीट तसेच स्टेनलेस सळई वापरण्यात आले आहे.
फियान, निसर्ग, तोक्ते यासारखी वादळे गेल्या काही वर्षात अधिकाधिक तीव्रतेची वारंवार उद्भवत आहेत. त्यानुसार सदर पुतळा सर्व वातावरणीय परिणामांच्या माऱ्यास योग्य प्रकारे तोंड येईल, या पद्धतीने संरचनात्मक संकल्पना करून बांधण्यात आला आहे.
पुतळ्याचे किमान आयुर्मान 100 वर्षे राहील अशा पद्धतीने ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांनी हे काम केले आहे. तसेच पुढील 10 वर्ष नियमित देखभाल व पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे.