सिंधुदुर्ग : सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे. सरकार पडायचं असतं तर सभागृहातील संख्याबळावर पडलं असतं, त्यामुळे उगाचच कुणीतरी सरकार पडणार अशी भाषा करू नये,असा टोला  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar)  खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) लगावला आहे.आमदार अपात्रतेबाबत (MLA Disqualification) योग्य वेळेत निर्णय घेणार असून विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, असे देखील राहुल नार्वेकर  म्हणाले. 


सरकार पडायचं असेल तर ते सभागृहातील संख्याबळावर पडत असते. सभागृहात अविश्वास ठराव झाल्यानंतर संख्याबळ कमी असेल तर ते सरकार पडते. बाहेर कोण बोलतोय म्हणून सरकार पडत नसतं.या सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे आणि तेवढी संख्या असल्याने त्यांनी बहुमताची अग्निपरीक्षा पास केली आहे. उगाचच कोणीतरी असंवैधानिकपणे सरकार पडणार पडणार अशी भाषा वापरू नये, असे राहुल नार्वेकर म्हणाले.  


विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही


आमदार अपात्रत्रेबाबत वेळेतच निर्णय होणार आहे असे  राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. राहुल नार्वेकर म्हणाले,  सुप्रीम कोर्टाने जो टाईम बाँड दिला आहे. त्यानुसार वेळेत निर्णय द्यायचा माझा विचार आहे. पण कोणत्याही नैसर्गिक न्याय तत्त्वाला धक्का पोहचणार नाही.  विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही. आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार  आहे, असे नार्वेकर म्हणाले.


आदित्य ठाकरेंना टोला


पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं आहे की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घ्यायचा नाही.निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे.   त्यामुळे उगाच पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लंघन झालंय  अशा प्रकारचे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी करू नयेत. जर या कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर निश्चितच सक्षम विधानसभा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेईन. महाराष्ट्रातील जनतेला मी आश्वासीत करतो की कुठल्या प्रकारचा चुकीचा निर्णय दिला जाणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने निश्चिंत राहावे, अशा प्रकारचं वक्तव्य करत आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.


स्थानिक स्वराज्य निवडणुका लांबणीवर


स्थानिक स्वराज्य निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सरकारने या निवडणुका लवकर व्हाव्यात असे आपले म्हणणे दिले आहे.  परंतु याचा निकाल न लागल्यामुळे या निवडणुका घेता येत नाहीत, असे नार्वेकर म्हणाले.  


दारुच्या किंमती कमी झाल्यास पर्यटनालाच फायदा होणार आहे. अशी दीपक केसरकर यांनी भूमिका घेतली होती याचा पर्यटन निश्चित फायदा होणार का? आणि सरकार हे दर कमी करू इच्छित का आहे का? असा प्रश्न राहुल नार्वेकर यांना विचारला असता प्रत्यक्षात हा कर कमी केल्यामुळे शासनाला किती तोटा होणार आहे. याकडे आधी बघितले पाहिजे पण त्या दृष्टीने जर कोकणाला फायदा होणार असेल तर सरकार त्याचा विचार करेल असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील लिकरचे दर कमी करावे अशी मागणी दीपक केसरकर यांनी मांडली होती. यावर राहुल नार्वेकर यांनी आपले मत स्पष्ट केले.