सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फक्त टीका करण्याची कामं केली, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गाला, कोकणाला काय दिलं? विकासाला पुरेसे पैसे देखील दिले नाहीत. कोकणात यायचं, मासे खायचं आणि जायचं एवढंच काम त्यांनी केलं अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. आक्रमकता आणि उद्धव, आदित्य ठाकरे यांचा संबंध काय? ठाकरे यांच्यात आक्रमकता होती तर नारायण राणे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांची गरज काय होती? बाळासाहेब ठाकरे गेले आणि शिवसेना संपली असंही ते म्हणाले. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरबंजारा समाजाचे दोन हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका केली. वैभव नाईक यांनी गोरबंजारा समाजाला भाजपमध्ये जाऊ नये यासाठी धमकी दिली असा आरोप नारायण राणे आणि निलेश राणे यांनी केला. आमच्या विरोधात असलेल्या पक्षांची लोकांना रोजगार निर्मिती करून ताकद आहे का असा सवालही त्यांनी विचारला.


वैभव राणे यांच्यावर टीका


ठाकरे गटाचे आमदार वैभव राणे यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, "राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक हे गोरबंजारा समाजाचे होते. मात्र वैभव नाईक यांचं नाव न घेता त्यांच्यावर राणे यांनी टीका केली. ते म्हणाले की, तो एक नाईक तुमच्या समाजाचा नाही. नऊ वर्षात काही काम केलं नाही. जिल्हा, राज्य आणि देशाच्या दृष्टीने वैभव नाईक या विद्वानाने कोणते विचार दिले? सभागृहात कधी उठून बोलला नाही, कारण त्याचे वजन एवढं आहे की त्याला उठता येत नाही. यापुढे गोरबंजारा समाजाला धमकी दिल्यास राणेशी गाठ आहे."


माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, या कार्यक्रमाला विरोध झालाय. 80 वर्षाच्या एका माणसाने धमकी दिली. त्याने खरा आशीर्वाद देणे आवश्यक होते. मात्र तुम्हाला दिलेली धमकी म्हणजे आम्हाला धमकी दिली. आमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही, आम्ही हिशेब याच जन्मात चुकता करतो. आम्ही राणे आहोत. गोरबंजारा समाजाला आमदार वैभव नाईक यांनी ऑफर दिली. मात्र ती या समाजाने धुडकावून लावली. आम्ही दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगत नाही. जर पुन्हा त्यांनी धमकी दिली तर तुम्ही फक्त मला कॉल करा, मी पुढचे काय ते बघतो. तुमच्याबरोबर राणे कुटुंबीय कायम आहेत. 


ही बातमी वाचा: