Konkan Politics : तळकोकणातील आगामी खासदार आणि आमदारकीसाठी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात आतापासून रस्सीखेच सुरु झाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना सावंतवाडी विधानसभा आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभेच्या जागेवर त्यांनी शिवसेनेचा दावा केला आहे. तर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जागा वाटप करण्यासाठी वेळ असून घाई न करता सबुरीचा सल्ला दोन्ही पक्षांच्या नेत्यांना दिला आहे. मात्र विरोधकांनी शिवसेना आणि भाजपवर टीका केला आहे. एक ना धड भाराभर चिंध्या म्हणत एकमेकांच्या उरावर दोन्ही पक्ष बसतील, असं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी म्हटलं आहे.
उदय सामंतांकडून कोकणातील 'या' मतदारसंघांवर दावा
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर हेच उमेदवार असतील. तर कुडाळ मालवण हा शिवसेनेचाच मतदारसंघ असून तिथेही शिवसेना आपला उमेदवार देणार आहे. मात्र कणकवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे असून तिथे भाजप उमेदवार ठरवेल. सोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवारीवर शिवसेना दावा करणार असल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.
उदय सामंतानी उगाच घाई करु नये : नारायण राणे
तर उदय सामंत यांच्या मतदारसंघांवर दावा केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे कोकणातील नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "निवडणुकीला अजून वेळ आहे, उद्योगमंत्री उदय सामंत यांना सांगेन उगाच घाई करु नका. दोन्ही बाजूची नावं पक्ष जाहीर करेल, असा सबुरीचा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना दिला आहे.
ठाकरे गटाची भाजप आणि शिंद गटावर टीका
दरम्यान, एकीकडे शिवसेना आणि भाजपकडून मतदारसंघांवर दावा केला जात असताना, ठाकरे गटाने मात्र त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एक ना धड भाराभर चिंध्या असं भाजप आणि मिंध्ये गटाचं चाललं आहे. एकमेकांच्या उरावर बसून जागा जाहीर करायच्या आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना स्वतःचा उमेदवार उभा करायचा आहे आणि उदय सामंत यांना स्वतःचा उमेदवार द्यायचा आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या उरावर बसणार आहेत, असा हल्लाबोल खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.