Shahajibapu Patil at Sindhudurg : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुडाळमधील (Kudal) एका खाजगी कार्यक्रमासाठी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) आले होते. यावेळी त्यांनी राजकीय, सामाजिक विषयांवर भाष्य केलं आणि ते या अगोदरही कोकणात फिरून गेले असल्यामुळं कोकणाचं वर्णन आपल्या खास शैलीत केलं. शहाजी बापू कोकणाच्या प्रेमात पडले. निसर्गसौंदर्यानं नटलेल्या या कोकणाचं वर्णन त्यांनी एखादी नवतरुणी साजशृंगार घालून सजवल्यानंतर जशी सुंदर दिसते, तसा महाराष्ट्राचा दागिना म्हणजे, कोकण असं केलं.


"नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या कुटुंबाशी माझं नातं एक अनामिक असं राजकारणाच्या पलीकडचं नातं आहे. जीवनात माणसाला चढ-उतार असतात आणि माझ्या जीवनातील वनवासाच्या काळात नारायण राणे यांच्यासोबत माझा जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला. त्यांनी माझी अनेक दुःख वाटून घेतली. माझ्या मुलीचं लग्न नारायण राणे यांनी केलं.", असं ते म्हणाले. 


एआर अंतुले आणि नारायण राणे या दोन माणसांनी कोकणाला दिशा दिली : शहाजीबापू पाटील 


"या देशाच्या लोकशाहीत जय आणि पराजय सतत चालूच राहणार आहेत. परंतु, यश मिळालं म्हणजे आपण जिंकलो आणि अपयश मिळाला म्हणून आपण हरलो, असं नाही. ही जनता तुमच्यावर नेतृत्व म्हणून प्रेम करतच राहत असते. या कोकणला दिशा फक्त दोन माणसांनी दिली. एआर अंतुले आणि नारायण राणे या दोन माणसांनी कोकणाला दिशा दिली. या दोन माणसांनी कोकणाच्या विकासासाठी दूरदृष्टीनं काम केलं आहे. आपण काम करत राहायचं फळ हे मिळणारच आहे.", असंही ते म्हणाले.  


संघर्षाची दुसरी नाव म्हणजे, नारायण राणे आणि एकनाथ शिंदे : शहाजीबापू पाटील 


"नारायण राणे यांच्या जीवनातील संघर्ष, निलेश राणे तुमच्याही जीवनात आणि माझ्याही जीवनात आला नसल्याचं वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी केलं. संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे, नारायण राणे, एकनाथ शिंदे. एकेकाळी स. का. पाटील हे नाव राजकारणात खूप मोठं होतं. त्याच स.का. पाटलांची सभा जर कोणी उधारी असेल तर त्याचं नाव आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ कोकणात रोवली आणि भगवा झेंडा संपूर्ण कोकणात फिरवला. नारायण राणेंना स्वतःचा जीव धोक्यात घालूनसुद्धा अनेक वेळा हे काम करावं लागलं.", असंही ते म्हणाले. 


"राजकारण हे गंगेच्या उगमासारखं आहे. गंगा उगमापासून हिमालयाच्या खोऱ्यात पडत पुढे सरकत असते, पुढे डोंगरांना, नद्यांना वळसा घेत कोलकात्याच्या महासागराला जाऊन मिळते. तसंच राजकारण हे एका ठिकाणी लावलेलं झाड नाही, जे झाड वाढत गेलं, फुललं, फळाला आलं, असं राजकारण मुळातच असत नाही. त्यामुळेच नारायण यांचा शिवसेनेतील प्रवास आज भाजपपर्यंतचा आहे. तर माझा प्रवास काँग्रेसमधून शिवसेनेचा आहे.", असं वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी सध्याच्या राजकारणावर केलं आहे.


लोकशाहीत कुठल्याही नेत्यानं स्वतःला मोठं समजू नये : शहाजीबापू पाटील 


"लोकशाहीत कुठल्याही नेत्यानं स्वतःला मोठं समजू नये, व्यासपीठावर बसले म्हणून कुठलाही नेता मोठा होत नसतो. तर लोकशाहीत व्यासपीठांसमोर बसलेली सामान्य जनता मोठी असते. कुडाळ हे कन्नड नाव आहे. कुडाळ म्हणजे संगम, मात्र हा संगम दोन नद्यांचा नसून इथल्या लोकांच्या मनात असलेला प्रेमाचा संगम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामतेनं आशीर्वाद दिला. हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, अलेक्झांडरला त्याच्या आईनं आशीर्वाद दिला, तो जगत जेता झाला तर नेपोलियनला त्याच्या आईनं आशीर्वाद दिल्यानं सम्राट झाला.", असंही ते म्हणाले. 


खासदारकीच्या निवडणुकीत कोकणात मी स्वतः येणार असा शब्द माजी खासदार निलेश राणे यांना शहाजीबापू पाटील यांनी दिला. कोकणात येऊन धुरळा पाडतो, कारण या दोन राऊतांवर माझा लय राग आहे, त्यांनी आमचं लय वाटोळं केलंय. त्यामुळे तुम्ही कितीही येऊ नका असं म्हटलं तरी मी इथे येणारच. संजय राऊत आता कुठे उभे राहणार नाहीत. ते कुठे उभे राहिले असते, तर मी तिथेही गेलो असतो. त्या दोन्ही राऊतांनी सगळं आमचं वाटोळ करून टाकलं असल्याचं वक्तव्य एका खाजगी कार्यक्रमात शहाजीबापू पाटील यांनी केलं. आणि उद्याचे कोकणातील खासदार निलेश राणे दिल्लीत जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


आमच्यात आणि ठाकरेंमध्ये दरी पडली ती 'या' दोघांमुळेच; शहाजीबापूंनी स्पष्टच सांगितलं