सिंधुदुर्ग : राज्य सरकारने (Maharashtra Government) महाराष्ट्रातील 6 हजार 600 मेगावॉट वीजपुरवठ्यासाठीचे कंत्राट अदानी समुहाला (Adani Group) दिले. यानंतर शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळा अदानी समूहाला हस्तांतरीत करण्यात आली आहे. चंद्रपुरमधील माउंट कार्मेल कॅान्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी समूहाकडे व्यवस्थापनासाठी देण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा घणाघात केलाय. आता यावरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
घुग्घुस येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी फाऊंडेशनला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही शाळा अदानी फाऊंडेशन, अहमदाबाद येथे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता. या संदर्भात 30 जून 2024 रोजी शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. अवघ्या तीन महिन्यांत या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आणि शाळा अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर?
चंद्रपूरमधील शाळा अदानी समूहाला व्यवस्थापनासाठी दिल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही शाळा खाजगी असून ती मोफत शिक्षण देण्यासाठी अशा प्रकारे निर्णय घेतले जातात. यातून अधिक चांगल शिक्षण आणि सोई दिल्या जातील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर संजय राऊत काहीही बोलतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे म्हणत दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
संजय राऊतांची टीका
याबाबत संजय राऊत म्हणाले होते की, हा छत्रपतींचा महाराष्ट्र अदानींचा करण्याचा घाट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी घातला आहे. संपूर्ण धारावी अदानींच्या घशात घालण्याचे काम सरकार करत आहेत. सर्व अदाणींच्या स्वादीन करतील. चांद्यापासून बांद्यापर्यंतचा महाराष्ट्र अदानींच्या नावावर करण्याचा घाट आहे. नरेंद्र मोदी हे अदानींचे एजंट म्हणून काम करतात हे आता दिसू लागले आहेत. महाराष्ट्रातही अदानींचे काही एजंट आहेत, अशी टीका त्यांनी केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या