Ashadhi Wari 2022 : अंधारल्या मार्गावरी कधी रुते पायी काटा, तुझ्यासंगे प्रवासात प्रकाशमान जाहल्या वाटा, धावून येशील संकटात देसी दुबळ्यांना हात, जरी आलो नाही पंढरपुरा तुझी नित्य असे साथ.. या काव्याची प्रचिती सिंधुदुर्गात येत आहे. चित्रकार समीर चांदरकर यांनी उद्या (10 जुलै) असलेल्या आषाढी एकादशी निमित्ताने बल्बमध्ये विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. 


मातीपासून तयार केलेली तीन सेंटीमीटर उंचीची ही मूर्ती एका छोट्याशा बल्बमध्ये उतरवून पांडुरंगाची कलाकृती साकारली आहे. ही मूर्ती मातीपासून साकारण्यात आली आहे. समीर चांदरकर यांनी घरीच सात ते आठ दिवसांच्या प्रयत्नांतून ही मूर्ती साकारली आहे.


थॉमस अल्वा एडिसन ज्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. या शोधामुळे सर्वत्र प्रकाश उजळून निघाला. पण कित्येक वर्ष अंधारात चाचपडत असलेल्या दीन दुबळ्यांना प्रकाशाची वाट दाखवणारा पांडुरंग आजही आपलं आयुष्य हे प्रकाशमय करत आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या दर्शनाला मुकले आहे. तेच भक्त आज नव्या जोशात वारीत बेभान होऊन नाचत आहेत. सोसाट्याचा वारा ,पाऊस या कशाचीही तमा न बाळगता पांडुरंग नामी तल्लीन झालेले आहेत. 


यंदा विक्रमी संख्येने भाविक पंढरपुरात
आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचं पंढरपुरात आगमन होणार आहे. कोरोनामुळे 2 वर्षांनंतर पायी चालत वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्यानं वारकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होत असून काल नवमीपर्यंत शहरात जवळपास सात लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो. मात्र, काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागेशेजारी असणाऱ्या 65 एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र विकसित केले आहे. यंदा रेल्वेच्या ताब्यात असलेले 40 एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा 105 एकर जागेत तब्बल 5 लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दुपारपर्यंत जवळपास चार लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले असून वाटून दिलेल्या प्लॉटवर त्यांनी आपले तंबू उभारले आहेत. या ठिकाणी पिण्याचे आणि वापराचे शुद्ध पाणी, आरोग्य व्यवस्था, स्वच्छतागृहे, वीज, डांबरी रस्ते आणि सुरक्षेसाठी पोलिसांची व्यवस्था केल्याने यंदा प्रथमच या ठिकाणी पाच लाखांपेक्षा जास्त भाविकांना येथे निवासाची सोय झाली आहे.