Sindhudurg Anganewadi Yatra : कोकणातील (Konkan)  प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या आंगणेवाडीच्या (Aanganewadi)  भराडी देवीची (Bharadi Devi)  यात्रेला आज 2 मार्चपासून सुरुवात होत आहे. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीच्या यात्रेला दरवर्षी चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी येतात. काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत आगणेवाडीत दाखल होणार आहेत. 


नवसाला पावणारी अशी भराडी देवी


मसुरे गावच्या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. तसा फलक 'आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर' म्हणून फलक लावला आहे. मात्र, नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं मंदिर सर्वांसाठी दर्शन खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडी देवीचं दर्शन घेतात. 


कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रा


भराडी देवीच्या जत्रेची तारीख देवीचा कौल घेऊन ठरवली जाते. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे, म्हणूनच या देवीला भराडी देवी असं म्हटलं जातं. मोठ्या उत्साहात आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रा होते, यात भाविकांसह राजकीय नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री देखील यावर्षी भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत. 


देश-परदेशात भराडी देवीच्या यात्रेचं आकर्षण


दक्षिण कोकणची काशी आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेचं महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात आकर्षण पाहायला मिळतं. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडते. यंदाही मोठ्या संख्येने भाविक आंगणेवाडीमध्ये दाखल झालं आहेत. भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. 


लाखो भाविक यात्रेत सामील होण्याची शक्यता


दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो.