सिंधुदुर्ग : कोकणातील (Konkan) प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची (Bharadi Devi) यात्रा येत्या 4 फेब्रुवारीला होत आहे. या दिवशी भाजप राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहे. कारण आंगणेवाडीच्या यात्रेच्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आंगणेवाडीच्या जत्रेला येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा (Anganewadi Jatra). दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात या देवीची जत्रा रंगते. आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात. राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता भाजप देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आंगणेवाडी जवळील भोगलेवाडी येथील माळरानावर घेण्याच्या तयारीत आहे. भाजपचे अनेक नेते या भव्य सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
नवसाला पावणारी भराडी देवी
मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत 'भराडी देवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं.
मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. तसा फलक आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर म्हणून फलक लावला आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले असते. भाविकांच्या गर्दी आणि श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात. दरवर्षी सुमारे 5 ते 7 लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो. साऱ्यांसाठी केवळ या आंगणेवाडीच्या महिला प्रसाद बनवतात.
धार्मिक महत्त्वासोबतच आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेमध्ये सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो. आंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात त्याला मांडावरचं नाटक म्हणतात. मिरजेहून गोंधळी येतात ते देवीसमोर गोंधळ मांडतात. दशावतार असतो. अनेक राजकारणी मंडळी भराडी देवीच्या दर्शनाला येतात.