Sindhudurg Rain : सध्या राज्याच्या विविध भागात धो धो पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडं शेती पिकांचं देखील या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या अंबोलीत यावर्षी आत्तापर्यंत 3450 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळं धबधबे ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. 


राज्यात अंबोलीत सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळं अंबोलीत सर्वत्र हिरवाईनं नटलेले डोंगर, फेसाळत कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, दाट धुकं अनुभवायला मिळतात. अंबोली आणि परिसरात 5 ते 6 महिने सूर्य नारायणाचे दर्शन देखील होत नाही. यावर्षी देखील अंबोलीत चांगला पाऊस सुरु आहे. आत्तापर्यंत अंबोलीत 3450 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं तेथील धबधबे ओसंडून वाहत असल्याचं चित्र दिसत आहे. अंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी असं म्हटलं जातं. पावसाळ्यात अंबोलीचा निसर्ग पाहण्यासारखा असतो. या काळात पर्यटक मोठ्या प्रमाणावर निसर्ग, धबधबे पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात.




जैव विविधतेनं नटलेल्या या आंबोलीत पाऊस पडत असल्यानं विविध प्रकारचे साप, बेडूक सापडतात. अंबोलीच्या तुलनेत जिल्ह्यात निम्म्याच्या आसपास पाऊस पडला आहे. अंबोलीमध्ये भाऊ ओगले हे पावसाचं प्रमाण मोजतात. गेली अनेक वर्षे ते न चुकता पर्जन्यमानाची नोंद ठेवत आहेत.




कावळेसाद पॉईंटचे सर्वांनांच आकर्षण


महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली जवळील गेळे गावात कावळेसाद पॉईंट या ठिकाणचा उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. कावळेसाद हे एक पठार असून पठारावरून वाहत आलेले पाणी जेव्हा कावळेसादच्या दरीमध्ये कोसळतं, तेव्हा ते पाणी दरीतून येणाऱ्या जोराच्या वाऱ्यासोबत पुन्हा वर येतं. हे अनोखं चित्र पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दीच गर्दी होताना दिसत आहे. उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याचं पर्यटकांना नेहमी आकर्षण असतं. काही क्षणात धुक्यात व्यापून गेलेली दरी, ऊन पाऊस हा खेळ, याठिकाणी पर्यटकांना वेगळ्याच वातावरणाचा फील देतो. त्यामुळे याठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात. विस्तीर्ण आणि खोल अशी आंबोली जवळील कावळेसादची दरी पर्यटकांना नेहमी आकर्षित करते. या ठिकाणच्या वातावरणात पर्यटक धबधब्याच्या खाली न जाता या कावळेसाद पॉईंटला उभे राहिले तरी ओलेचिंब होतात.


महत्त्वाच्या बातम्या: