सिंधुदुर्ग: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटांचा ब्राँझचा पुतळा नुकताच कोसळला होता. यानंतर पोलिसांनी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, पुतळा कोसळल्यापासून कल्याणमध्ये राहणारा जयदीप आपटे (Jaydeep Apte) हा फरार झाला आहे. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी राजकोट किल्ल्यावरुन भाष्य केले. 


अजित पवार शुक्रवारी सकाळीच राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांना या दुर्घटनेसाठी दोषी असलेल्या व्यक्तींविषयी विचारणा करण्यात आली. यावर अजित पवार यांनी म्हटले की, याप्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं नौदल दिनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याठिकाणी उपस्थित होतो. त्यावेळी पुतळा व्यवस्थित दिसत होता. पण आता आम्ही या सगळ्याच्या खोलात जाऊ. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. काही व्यक्ती ज्यांनी पुतळ्याचं काम केलंय, ते सापडत नाहीत. पण तो पळून पळून जाणार कुठे, तो महाराष्ट्राच्या किंवा देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्याला लवकरच शोधलं जाईल. पुतळ्याच्या उभारणीत नेमकी काय चूक झाली, हे त्याच्याकडून जाणून घेतलं जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले.


शेजारची खासगी जमीन घेऊन नवं स्मारक उभारणार: अजित पवार


राजकोट किल्ल्यावर जी घटना घडली त्याचं दु:ख सगळ्यांना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या इतिहासाबद्दल सर्वांना अभिमान आहे. त्यामुळे पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, आता याठिकाणी महाराजांच्या नावाला साजेसे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किल्ल्याच्या शेजारी खासगी जमीन आहे. गेल्यावेळी आम्ही आलो होतो तेव्हा ही जमीन घ्यायचा विचार होता. संबंधित खासगी व्यक्ती स्मारकाच्या कामासाठी जमीन द्यायला तयार आहे. त्याला योग्य तो मोबदला देऊन ही जमीन घेतली जाईल. त्यानंतर याठिकाणी बारकाईने लक्ष देऊन उत्कृष्ट प्रतीचा शिवरायांचा पुतळा उभारला जाईल. याबाबत बैठक झाली आहे, सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. 


यावेळी अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर उभारला जाणारा शिवरायांचा नवा पुतळा हा ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांच्याकडून उभारला जाईल, असे संकेत देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राम सुतारांशी याबाबत बोलले आहेत. राम सुतार यांना याबाबत सखोल ज्ञान आहे. हा पुतळा समुद्रकिनाऱ्यावर असल्याने त्याची उंची, वाऱ्याचा वेग आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन पुढील गोष्टी ठरवल्या जातील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. 


VIDEO: अजित पवार राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी



आणखी वाचा


जयदीप आपटेचं मित्रासोबतचं संभाषण व्हायरल, शिवाजी महाराजांच्या डोक्यावर खोक, मित्र म्हणाला सुरेख डिटेलिंग!