Ajit Pawar: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेवरुन राज्यभरातील वातावरण तापले आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. असं असतानाच आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज(शुक्रवारी) सकाळी किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) या घटनेत दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 


तर बुधवारी किल्ल्यावर या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते किल्ल्यावर आले होते. मात्र नेमक्या त्याचवेळी तिथे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे हेदेखील आपल्या समर्थकांसह पोहोचले. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले. तर बघता बघता शाब्दिक चकमक थेट धक्काबुक्की आणि हाणामारी पर्यंत जाऊन पोहचल्याचे बघायला मिळाले. या पवित्र ठिकाणी राजकीय संघर्ष दिसून आला यावर बोलताना अजित पवार म्हणाले, 'हे ज्याचं त्याला कळालं पाहिजे, मी वारंवार सांगतो, संयुक्त महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री मिळाले ते यशवंतराव चव्हाण, त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, कशा पध्दतीने तिथे राजकारण झालं पाहिजे, सुसंस्कृतपणा कसा दाखवला पाहिजे,या सर्व गोष्टी आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी शिकवल्या आहेत, उभ्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी अनेक पदं भूषवली. त्यांचा इतिहास वाचल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतील. त्यामुळे आमच्यासह सर्व राजकीय पक्षांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, तेथील कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात काहीही करता कामा नये असं अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे. 


तर ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे असा सल्लाही अजित पवारांनी (Ajit Pawar) यावेळी सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे. 


आम्ही पाहणी करायची नाही का? 


सर्व नेत्यांच्या पाहणी दौऱ्यानंतरचा अंतिम रिझल्ट जनतेसमोर कधी येईल या पत्रकाराच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, आम्ही पाहणी करायची नाही का? याबाबात चर्चा करत असताना नेमकी परिस्थिती काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, ते पाहणं गरजेचं आहे. इतरांनी पाहणी कू शकतात आम्ही त्यामुळे पाहणी करत आहोत, ते आमचं कर्तव्य आहे, आमचं काम आहे, त्या भावनेतून आम्ही आलो आहोत, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे. 


नेमकं काय घडलं?


घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार, महाविकास आघाडीतील काही नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले. नेमके त्याचवेळी महायुतीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे देखील राजकोट किल्ल्यावर पाहाणी करण्यासाठी दाखल झाले. यावेळी काँग्रेस नेते आणि विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार देखील उपस्थित होते. 


कधीकाळी सहकारी आणि आता कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी आमने-सामने आल्यानंतर हस्तांदोलन केलं. महाविकास आघाडीकडून मोर्चा आयोजित करण्यात आल्याने माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थकसुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचले. मात्र, ठाकरे आणि राणे आमने-सामने आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. नारायण राणे समर्थक आणि विनायक राऊत समर्थक आमने सामने आल्यानं राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग घडला. हा राडा एका बाजूनं सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेसुद्धा पोहोचले. यावेळी पेंग्विन, पेंग्विन अशा घोषणा देण्याचा प्रयत्न केला. पण आदित्य ठाकरे कोणतीही प्रतिक्रिया न देता, किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी निघून गेले.