ShaniShingnapur Road Accident: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शनीशिंगणापूर मार्गावर भीषण अपघाताची घटना उघडकीस आली. उंबेरे गावाजवळ रिक्षा आणि मिनी बसची समोरासमोर धडक झाली. या धडकेत इगतपुरीजवळील गिरणारे येथील तीन तरूणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. तर, इतर दोघे जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. काही तरूण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. तर, त्यातील काही तरूण दर्शनासाठी शनीशिंगणापूरला दर्शनासाठी जात होते. दरम्यान, राहुरीजवळ समोरून येणाऱ्या मिनी बसची रिक्षाला धडक बसली. यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तर, मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली, तर, नाशिकच्या सटाण्याजवळही भीषण अपघात घडला. या अपघातात आमलीपाडा येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही अपघाताच्या घटनेनंतर नाशिक हादरले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरूण पालखी घेऊन शिर्डीला जात होते. तर, त्यातील काही तरूण शनिशिंगणापूरला निघाले होते. तिघेही रिक्षाने निघाले होते. परंतु, दर्शनापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राहुरीहून समोरून येणाऱ्या मिनी बसने रिक्षा धडक दिली. अपघात घडताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदतकार्याला सुरूवात केली. या भीषण अपघातात रिक्षातील दीपक जगन डावखर (वय वर्ष २२), आकाश मनोहर डावखर (वय वर्ष 22) आणि दीपक विजय जाधव (वय वर्ष 22) या तिघांचा अपघाती मृत्यू झाला.
तिघे तरूण इगतपूरी येथील रहिवासी
तिघेही नाशिकच्या इगतपूरी येथील गिरणारे गावचे रहिवासी होते. तर, रूपेश गणेश भगत (वय वर्ष 19) आणि रोशन गंगाधर डावखरे हे दोघेही गंभीर जखमी आहेत. त्या दोघांवर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातानंतर तरूणांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सटाण्यात अपघात, दाम्पत्याचा मृत्यू
नाशिकच्या सटाण्यातही भीषण अपघाताची घटना घडली. साक्री - शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ढोलबारे गावाजवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास अपघाताची घटना घडली. येवल्याहून मुलांना भेटून दाम्पत्य दुचाकीवरून घरी परतत होते. मात्र, मागून येणार्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. तर, दुचाकी थेट समोरून येणाऱ्या पिकअपला आदळली. या अपघातात संदीप दासू गावित (वय वर्ष 35) आणि त्यांची पत्नी आशा संदीप गावित दोघांचा जागीच मृत्यू झाला.