Titeekshaa Tawde on Ajit Pawar : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Assembly Elections 2024) जोरदार प्रचार सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. प्रचारातून मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे कसोशीचे प्रयत्न सध्या राजकीय पक्ष करत आहेत. त्यातच त्यांच्यासाठी बरेच सेलिब्रेटी देखील प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. इतकच नव्हे तर काही सेलिब्रेटी हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार करत असल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) हिने नुकतच अजित पवारांना (Ajit Pawar) मतदान करण्याचं आवाहन करणारा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील लाडकी बहिण योजनेचा प्रचार करत महायुती सरकारला मत देण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता तितिक्षानेही तिच्या सोशल मीडियावर अजित पवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तितीक्षाने लाडकी बहिण योजनेचंही कौतुक केलंय. दादाचा वादा असा हॅशटॅगही तिने तिच्या व्हिडीओला दिला आहे.
तितीक्षाने शेअर केला व्हिडीओ
तितीक्षाने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'अजित दादांनी राज्यातील अडीच कोटी महिलांना लाडकी बहिण बनवत, महिन्याला 1500 रुपयांचा लाभ देऊन आर्थिक स्वावलंबनाचं पाठबळ दिलंय. या योजनेमुळे महिलांना मिळालेला लाभ आणि बळ पाहता पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर आपल्या या लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये देण्याचा अजिदादांचा वादा आहे. चला तर मग, येत्या 20 नोव्हेंबरला घडाळ्याचं बटण दाबून महायुतीला बळकट करुयात.'
तितीक्षाने हा व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन देत म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादांनी कायम आपल्या सर्वांच्या हितासाठी लोककल्याणकारी भूमिका बजावली आहे.आपल्या दादांमुळे *कित्येक* लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभातून त्यांच्या संसाराला मदतीचा हात मिळाला आहे. येत्या काळात तोच लाभ 1500 वरुन 2100 करण्याचा दादांचा वादा आहे.महिला सशक्तीकरणाच्या या कार्यात दादाला पाठबळ देऊया, लाडकी बहीण योजनेला सुरक्षित करूया!त्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला घड्याळाचे बटण दाबा! हॅशटॅग 'दादाचावादा'
ही बातमी वाचा :
कोरियन इंडस्ट्री हादरली; कोरियन ड्रामा अॅक्टर Song Jae Rim चं निधन, राहत्या घरात आढळला मृतदेह