Shah Rukh Khan Pathaan Movie Box Office : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीलाच हिंदी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. आता या सिनेमाने सिनेमागृहात 50 दिवस पूर्ण केले असून अजूनही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
जगभरातील 935 सिनेमागृहांत 'पठाण'चे शो
शाहरुखच्या 'पठाण'ने भारतात 500 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतासह 20 देशांतील सिनेमागृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. भारतातील 800 तर दुसरीकडे 20 देशांतील 135 सिनेमागृहांत 'पठाण' हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. अजूनही या सिनेमाचे हाऊसफुल्ल शो होत असून बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.
शाहरुख खानचा अॅक्शन मोड, सिनेमातील गाणी, संवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शाहरुखसह या सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'पठाण' या सिनेमावर रिलीजआधी मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पण वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे.
बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा बोलबाला
'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. सिनेमावर टीका झाल्यानंतर शाहरुखने या सिनेमाचं प्रमोशनदेखील केलं नाही. पण तरीही लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली. चांगलं कथानक, उत्तम दिग्दर्शक, सिनेमाची योग्य बांधणी आणि उत्कृष्ट कलाकार असतील तर तो सिनेमा यशस्वी होतोच.
'पठाण'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Pathaan Box Office Collection)
रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 800 सिनेमागृहांत प्रदर्शित होणारा शाहरुखचा 'पठाण' हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. आतापर्यंत या सिनेमाने भारतात 521 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 1043 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता शाहरुख खानचा 'जवान' आणि 'डंकी' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.