Continues below advertisement

Udayanraje Viral Video : सातारा म्हटलं तर सर्वात आधी नाव येतं ते खासदार उदयनराजेंचं. पक्ष कोणताही असो, उदयनराजेंचा दरारा आणि दबदबा कायम आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादीतून तीन वेळा आणि भाजपमधून दोन वेळा खासदार झालेत. उदनयराजेंनी केलेली अनेक वक्तव्यं व्हायरल होतात, त्यांची स्टाईलही हटके असते. त्यांचा असाच एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये उदयनराजेंनी साताऱ्यातील (Satara) रस्त्यांच्या अवस्थेला सरकार नव्हेत तर थेट वृक्षतोड, ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत असल्याचं सांगितलं.

आपण झाडे तोडली, म्हणून कधीही धो धो पाऊस पडतोय, कुठेही पूर येतोय आणि रस्ते वाहून जातात असा अजब युक्तिवाद उदयनराजेंनी केला. पाऊस पडल्यामुळे रस्ते वाहून जातात हे खरं आहे... पण त्याला निकृष्ट दर्जाची कामं, त्यातील भ्रष्टाचार, नेते-अधिकारी-कंत्राटदाराची भ्रष्ट साखळी जबाबदार नसून तुम्ही आम्ही जबाबदार असल्याचं अप्रत्यक्षपणे उदयनराजेंनी म्हटल्याचं दिसतंय.

Continues below advertisement

Satara Election : सरकारचं अपयश नाही

साताऱ्यातील रस्त्यांची झालेली चाळण हे सरकारचे अपयश नाही तर त्याला तुम्ही आम्ही कारणीभूत आहोत. आपण झाडे तोडली, त्यामुळे कधीही पाऊस पडतोय आणि रस्ते धुऊन जातात असं उदयनराजेंनी म्हटलं. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे आणि झाडे जगवली पाहिजेत असंही ते म्हणाले.

Udayanraje On Satara Road : तुझं कंबरडं मोडलंय का?

यंदाच्या पहिल्याच पावसात साताऱ्यातील रस्ते वाहून गेले. ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसत होतं. रस्त्यांच्या झालेल्या चाळणीमुळे अनेकांचं कंबरडं मोडलं, अनेकांना दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे लोकही वैतागले आहेत. त्यावर साताऱ्यातील एका स्थानिक पत्रकाराने उदयनराजेंना प्रश्न विचारला. सातारा शहरातील रस्त्यांची अवस्था पाहिली तर सातारकरांचं कंबरडं मोडलं आहे, त्यावर लोक सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत असं तो म्हणताच उदयनराजेंनी त्यावर 'तुझं कंबरडं मोडलंय का?' असा प्रश्न केला.

Udayanraje On Satara : नेमकं काय म्हणाले उदयनराजे?

साताऱ्यातील रस्त्याच्या प्रश्नावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, "साताऱ्यातील रस्ते धुऊन जातात याला कारणीभूत सरकार नाही. याला कारणीभूत तुम्ही-आम्ही आहोत. तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्यापेक्षा गंभीर प्रश्न मी तुम्हाला विचारतो. पहिला 3 किंवा 4 जूनला पाऊस पडत होता, आता पडतोय का? ज्या वृक्षांमुळे तुम्ही आम्ही जिवंत आहोत, त्या वृक्षांची तुम्ही तोड केली. आज कधीही गारपीट पडते, पूर येतो, नुकसान होतं, एवढा धो-धो पाऊस कधीही पडतो. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे, झाडं जपली पाहिजेत. या गोष्टी काही एका दिवसात होत नाहीत."

Udayanraje On BJP : भाजपमध्ये सर्वसामान्यांना संधी

उदयनराजे फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. साताऱ्यातील रस्त्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी थेट विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मी बोलत नाही, तर एक व्यक्ती म्हणून बोलतोय. या आधी पश्चिम महाराष्ट्रातील लोकानी ज्यांना संधी दिली त्यांनी किती लक्ष दिलं? निवडणुका आल्या की लोकांपुढे जायचं आणि सांगायचं की आम्ही हे करतो, ते करतो."

आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली. या आगोदर काय व्हायचं? मी शिफारस करायची आणि कुणाला तरी तिकीट मिळायचं अशी पद्धत होती, असंही उदयनराजे म्हणाले.

Satara Udayanraje Video : व्हिडीओ एक महिन्यापूर्वीचा

खासदार उदयनराजेंचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ एक महिन्यापूर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळीच्या दरम्यान एका स्थानिक पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देताना उदयनराजेंनी वरील वक्तव्य केलं. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून आता तो व्हिडीओ व्हायरल केला जात असल्याची चर्चा आहे.

Satara Problems : साताऱ्यात शिक्षण, रोजगाराच्या संधीचा अभाव

साताऱ्यामध्ये एमआयडीसी आणि शिक्षणाचा अभाव हे दोन मुद्दे सर्वाधिक गंभीर आहेत. साताऱ्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना शेजारच्या पुण्याला जावं लागतं. त्याचसोबत औद्योगिकीकरण झालं नसल्यानेही युवकांना नोकरीसाठीही पुण्यात जावं लागलं. त्यामुळे खासदार उदयनराजे आणि जिल्ह्यातील मंत्र्यांनी, आमदारांनी या दोन गोष्टींवर काम करावं अशी मागणीही सातत्याने होत आहे.

ही बातमी वाचा: