सातारा : राज्यात आतापर्यंत महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो ज्या ठिकाणी एकही उमेदवार अजूनपर्यंत घोषित झालेला नाही असा मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघ आहे. सातारमध्ये लोकसभा निवडणुकीत कोण उमेदवार असणार याची चर्चा आजही सुरूच आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले असले, तरी अजून त्यांची उमेदवारी मात्र भाजपकडून घोषित झालेली नाही.


मी राजकारण कधीच केलं नाही


उदयनराजे भोसले यांनी आज (4 एप्रिल) कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे म्हटलं आहे. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांनी संवाद साधताना सातारमध्ये उभं राहणार म्हणजे राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले की, सगळ्यांच्या गाठीभेटी घेत आहे, सर्वांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे उदयनराजे म्हणाले. दरम्यान, तुमच्यासमोर उमेदवार निश्चित होत नसल्याने काय सांगाल? याबाबत विचारले असता उदयनराजे यांनी मी राजकारण कधीच केलं नाही. समाजकारण केलं आहे, कधी कोणाला दुखावण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे लोकं ठरवतील काय करायचं ते असे उत्तर त्यांनी दिले. 


ते माझ्यासाठी वडिलधारी आहेत


शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या सातारा दौऱ्यामध्ये उदयनराजे स्टाईलमध्ये कॉलर उडवली होती. त्यामुळे उदयनराजे यांना साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांना कॉलर उडवण्यावरून विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, माझं बारसं जेवलेल्या लोकांबद्दल काय बोलणार? ते माझ्यासाठी वडीलधारी आहेत अशी प्रतिक्रिया दिली. कॉलर काढून घ्याल पण लोकांचा जीव काढून घेऊ शकणार नाही असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना लगावला. 


ज्यांना उभारायचं त्यांना राहू द्या


सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याबाबत आपली कोणाशी चांगली मैत्री आहे असं विचारण्यात आले असता उदयनराजे यांनी माझे कोणाशीच वैचारिक मतभेद नसल्याचे सांगितले. त्यांची मते त्यांच्याजवळ, माझी मते माझ्याजवळ असल्याचे ते म्हणाले. ज्यांना उभारायचं त्यांना राहू द्या, असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले. आता मी बच्चा राहिलेले नाही हे0 त्यांच्या लक्षात आलं असेल. मला माझं कार्य केलं पाहिजे असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या