Mahabaleshwar Weather : राज्यात उष्माघाताने बळी जात असताना, नद्या कोरड्या पडत असतानाच सातारा (Satara News) जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar Weatherगेल्या काही दिवसांपासून विचित्र वातावरणाचा खेळ सुरु आहे. राज्यात सर्वदूर उष्णतेची लाट सुरु असतानाच महाबळेश्वरचा पारा कमालीचा घसरला आहे. महाबळेश्वरमध्ये तापमान 12 अंशापर्यंत खाली आलं आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हाळ्यात थंडीचा अनुभव येत आहे. दुसरीकडे, वेण्णालेक परिसरातही तापमान महाबळेश्वरपेक्षाही खाली आलं आहे. वेण्णालेक तापमान अवघ्या 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे. 


गेल्या चार महिन्यांपासून विचित्र तापमान 


जानेवारी महिन्यातही महाबळेश्वर आणि वेण्णालेकमध्ये तापमान घसरले होते. वेण्णालेक परिसरात 5 अंश, तर संपूर्ण महाबळेश्वर शहरातील सरासरी तापमान 7 अंशांवर आले होते. ही गेल्या दोन वर्षांतील निचांकी तापामानाची नोंद होती. 


महाबळेश्वरात ढगफुटीसदृश्य पाऊस


दुसरीकडे, महाबळेश्वरमध्ये तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. तुफानी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्यांना मोठा फटका बसला. 


सातारा जिल्ह्याला अवकाळीचा फटका 


आठवडाभरापूर्वी राज्यात अवकाळीने धुमाकूळ घातला होता. यावेळी सातारा जिल्ह्याला सुद्धा फटका बसला. सातारा शहरासह वाई, पाचगणी, भिलार, जावळी, उत्तर कोरेगावला झोडपून काढले होते. चार दिवस अवकाळीने थैमान घातल्याने शेतीला फटका बसला आहे. गारांच्या माराने स्ट्रॉबेरी आणि भाजीपाला पिके पाण्यात जाण्याची वेळी आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार देशातील विविध राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशात आतापर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब-हरियाणा, छत्तीसगड या राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानात घसरण झाली असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या