Satara News: महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राजकारण आणि सत्ताकारण इतक्या निंदनीय थराला कधीच गेले नव्हते. वाटेल ते करीन, पण सत्तेत जाईन, ही जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची स्पर्धा पाहिली, अशा शब्दात श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी राज्यात सुरु असलेल्या खिचडी झालेल्या राजकारणावर भाष्य केले आहे. उपोषण करून आम्ही मेलो, तरी हे लोकं दखल घेणार नाहीत, अशी हताश प्रतिक्रियाही त्यांनी दिली. सत्तेतील राजकारण्यांचा जनतेला वीट आल्याचेही ते म्हणाले. डॉ. भारत पाटणकर म्हणाले की, या लोकप्रतिनिधींना मतदान करणारी 95 टक्के जनता गोरगरीब, शोषित आणि वंचित घटकातील आहे. त्यांच्या सोबत असे वागणे महाभयंकर आहे. विरोधी पक्ष सुद्धा याच माळेचे मणी झाले आहेत, हे जनतेचं दुर्भाग्य आहे.
कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रधान सचिव पुनर्वसन, उच्चाधिकार समिती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी झालेल्या बैठकांच्या आजपर्यंत झालेल्या इतिवृत्तावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या सह्या झालेल्या नाहीत. आजपर्यंत बैठक झाल्यानंतर 15 दिवसांत सह्या होत होत्या. मात्र, आज दोन-दोन महिने झाले तरी एकाही इतिवृत्तावर सह्या झालेल्या नसल्याचे ते म्हणाले.
आम्ही मेलो तरी त्याची दखल घेणार नाहीत
पाटणकर म्हणाले की, सत्तेतील राजकारणी सत्तेच्या साठमारीत आंधळे होऊन ओढाओढीत आकंठ बुडाले आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांची त्यांना आठवणही राहिलेली नाही. अशा परिस्थितीत आमरण उपोषणासारखा लढा करून आम्ही मेलो तरी त्याची दखल घेण्याचे भान त्यांना असणार नाही, त्यामुळे आम्ही या लढ्याची तारीख पुढे ढकलून येत्या 27 जुलैपासून पुढील लढ्याला सुरुवात करणार आहे.
ते पुढे म्हणाले की, सत्तेत असलेले व नवीन गेलेल्यांमध्ये मंत्रिपदासाठी प्रचंड चढाओढ सुरू आहे. राज्याच्या इतिहासात राजकारण आणि सत्ताकारण एवढ्या निंदनीय थराला कधीच गेले नव्हते, इतके भयंकर कधी घडले नव्हते, गेल्या चार दिवसांत राजकारणी इकडून तिकडे पक्ष बदलत आहेत. जनतेशी त्यांना देणे घेणे नाही. त्या अशा परिस्थितीमुळे 19 जुलैपासून सुरू होणारे धरणग्रस्तांचे उपोषण 10 दिवस पुढे ढकलून येत्या 27 जुलैपासून कोयना जलाशयाच्या काठावर कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार आहे. या उपोषणास कोयना, तारळी, वांग, उरमोडी, चांदोली या प्रकल्पातील सुमारे दोन हजार धरणग्रस्त सहभागी होणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या