सातारा : सातारमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार निश्चित होताच आता आरोपांच्या फैरी सुद्धा रंगू लागल्या आहेत. साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महेश शिंदे यांनी नवी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात 4 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 


रडीचा डाव केला जात आहे


महेश शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, महविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाल्यानंतर उद्या (15 एप्रिल) मी शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहे. लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याने रडीचा डाव केला जात आहे. मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे. जर यामध्ये मी दोषी आढळलो, तर मी माझा उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.


उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा का नाही?


दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्यांच्या उमेदवारीची घोषणा होत नसल्याने खोचक शब्दामध्ये टीका केली आहे. ते म्हणाले की, छत्रपतींच्या गादीचा सन्मान करावयाचा होता, तर भाजपने त्यांचे नाव जाहीर करावयास इतका वेळ का लावला आहे? त्यांनीच हा प्रश्न त्यांच्या मनाला विचारावा मी छत्रपतींच्या गादीबद्दल बोलणार नाही, माझे उदयनराजे किंवा इतर लोकांशी वैचारिक वाद नाही छत्रपतींच्या गादीच्या सन्मानाच्या गोष्टी करणाऱ्यांनी छत्रपतींच्या गादीचा किती सन्मान ठेवला? असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी केला. 


भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी मुंबईत साताऱ्याच्या गादीचा सन्मान ठेवून उदयनराजे भोसले यांना बिनविरोध करावे, असे आवाहन केले होते. यानंतर शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, मागील वेळी ते राष्ट्रवादी असताना त्यांचा प्रचार करण्यासाठी मीच आघाडीवर होतो. आत्ताची लढाई महाराष्ट्र आणि साताऱ्याच्या स्वाभिमानाची आहे. त्या आणि आताच्या काळात फरक एवढाच आहे की आताच्या काळात लोकशाही टिकवण्यासाठी संघर्षाची लढाई आहे. सातारा जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा, याची लढाई आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या