मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश या एसआयटीला देण्यात आले आहेत.
तेजस्वी सातपुते या 2012 सालच्या आयपीएस अधिकारी असून त्यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेता या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा आहे.
Satara Doctor Suicide News : एसआयटी चौकशीची मागणी मान्य
फलटण प्रकरणात अनेक राजकीय नावांचा समावेश असल्याने, त्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली. सातारा पोलिसांनी याची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो, त्यामुळे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात तपास करण्यात येणार आहे.
फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरने 23 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. त्यावेळी तिने हातावर सुसाईड नोट लिहिल्याचं समोर आलं. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप करण्यात आला. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना फलटण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यो दोघांचीही सातारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
Phaltan Doctor Case : रणजितसिंह निंबाळकरांवर आरोप
महिला डॉक्टरने तिच्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याची तक्रार केली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी खासदारांच्या दोन पीएंनी दबाव टाकल्याचा उल्लेख तिने तक्रारीत केला होता. मात्र तिच्या तक्रारीकडे पोलिसांनी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळेच शेवटी तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे नाव घेतलं. फलटणमधील अशा अनेक घटनांमागे निंबाळकर आणि त्यांच्या लोकांचा हात असल्याचा आरोप करत अंधारेंनी काही पुरावेही समोर आणले.
ही बातमी वाचा: