सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील दरे या मूळगावी गेले होते. दरेगावी मुक्कामी असताना त्यांनी 68 व्या अखिल भारतीय ड्युटी मीट स्पर्धेत यश मिळवणाऱ्या सातारा पोलीस दलाच्या डॉग स्क्वॉडमधील लेब्राडोर श्वान सूर्या आणि डॉग हँडलर पोलीस काँन्स्टेबल निलेश दयाळ आणि त्यांचे सहकारी विजय सावंत अनिल खटावकर याचंं अभिनंदन केलं. एकनाथ शिंदे यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली.
सातारा पोलीस दलाच्या डॉग स्क्वॉडमधील लेब्राडोर श्वान ‘सूर्या’ आणि पोलीस हवालदार निलेश दयाळ यांनी रांची येथे नुकत्याच पार पडलेल्या 68 व्या अखिल भारतीय ड्युटी मीट स्पर्धेत ‘स्फोटक शोधणे’ प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या विशेष कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढे येऊन आपल्या दरेगाव येथील निवासस्थानी विशेष सत्कार केला.या भेटीवेळी लेब्राडोर श्वान सूर्या, पोलीस हवालदार निलेश दयाळ यांच्यासोबतच त्यांचे सहकारी विजय सावंत आणि अनिल खटावकर उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळालेला हा सन्मान केवळ पोलीस दलासाठीच नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी एक गौरवाचा क्षण ठरला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या तरुणपणी पाळलेल्या श्वानाची आठवण सांगितली. त्यांनी सूर्या श्वानाला आपुलकीने जवळ घेतले व त्याला स्वतःहून थंड ताक व ब्रेड खायला दिले. या प्रसंगी एकनाथ शिंदे यांचे प्राणीप्रेम दिसून आले.तसेच त्यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली आणि "पोलीस विभागाला या संदर्भात कुठलीही मदत लागल्यास, ती निश्चितपणे दिली जाईल" अशी हमी दिली.
या भेटीत लेब्राडोर श्वान सूर्याने काही प्रात्यक्षिकेही सादर केली, जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांसमोर झाली आणि उपस्थितांनी याचे विशेष कौतुक केले. सूर्या आणि निलेश दयाळ यांच्या या कामगिरीने सातारा पोलीस दलाची शान उंचावली आहे आणि महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटावा असे हे यश ठरले आहे.
दरम्यान, सातारा पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकातील लेब्राडोर श्वान आणि निलेश दयाळ यांचा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्याकडून यापूर्वी सत्कार करण्यात आला आहे.
इतर बातम्या :