सातारा : पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर घड्याळ काढून तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत फलटणचे आमदार दीपक चव्हाण हेदेखील शरद पवारांच्या पक्षात जाणार अशी चर्चा आहे. आपण सध्या तरी अजितदादांसोबतच आहे अशी प्रतिक्रिया आमदार दीपक चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. एका आठवडापूर्वीच अजित पवारांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली होती. 


अजितदादांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ओघाने आपली उमेदवारी जाहीर केली होती. अजून जागावाटप झाले नसल्याने उमेदवारीचं काही ठरलं नसल्याचं आमदार दीपक चव्हाण यांनी म्हटलं. फलटणच्या उमेदवारीची चर्चा झालेली नाही असंही ते म्हणाले.


सध्या तरी अजितदादांसोबत


रामराजे निंबाळकर अजितदादांना सोडून शरद पवारांची साथ देणार असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार दीपक चव्हाण म्हणाले की, अजून तशी काही चर्चा नाही. आजचा कार्यक्रम हा वेगळा आहे. रामराजेंची तशी कोणतीही भूमिका नाही. मी सध्या तरी अजितदादांसोबत आहे. 


रामराजे निंबाळकर शरद पवारांसोबत जाणार? 


लोकसभेसारखंच विधानसभेआधीही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणित बदलताना दिसत आहेत.  हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर  यांच्याविरोधात दंड थोपटणारे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरही आता शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. याबाबत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 


रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी रात्री फलटण येथे कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन त्यांच्याच कलाने निर्णय घेतील अशी चर्चा आहे.


ही बातमी वाचा: