Bandatatya Karadkar Hospitalised : वारकरी संप्रदायातील धडाडीचे संत म्हणून ओळख असणारे आणि राज्यभर व्यसनमुक्तीची चळवळ चालवणारे हभप बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना पक्षाघाताचा सौम्य झटका (Paralysis Attack) आला आहे. त्यांच्यावर सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण इथल्या निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. बंडातात्या यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती निकोप रुग्णालयातील डॉक्टर जे टी पोळ यांनी दिली. 


बंडातात्या यांची प्रकृती स्थिर


बंडातात्या कराडकर हे पुण्याहून कीर्तन करुन फलटण तालुक्यातील पिंप्रद इथल्या मठात आले होते. बंडातात्या यांना काल (12 जानेवारी) सकाळी त्रास जाणवू लागल्यावर निकोप हॉस्पिटलमध्ये त्यांच्या साधकांनी दाखल केले होते. यावेळी तात्यांचा रक्तदाब आणि शुगर खूपच वाढल्याने त्यांचा त्रास वाढला होता. यामुळे त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका येऊन गेल्याचे लक्षात येताच हॉस्पिटलमधील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार सुरु केले. कालच्या उपचारानंतर तात्यांची प्रकृती स्थिर झाली. यानंतर त्यांचा MRI आणि अँजिओग्राफी केल्यावर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत थोडे ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. त्यामुळे मेंदूला होणार रक्तपुरवठा कमी होत असल्याने डॉक्टरांनी यावर देखील तातडीने उपचार सुरु केले. 


पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात हलवलं  


दरम्यान बंडातात्या यांना आज पुणे इथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर डिजिटल सब्स्ट्रक्शन अँजिओग्राफी केली जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या तात्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे साधकांकडून सांगण्यात येत आहे. तात्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती मिळताच त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने फलटणमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 


बंडातात्या कराडकर... कायम चर्चेत असलेलं नाव


बंडातात्या कराडकर हे नेहमी चर्चेत असणारं नाव आहे. अनेक वादांमध्ये बंडातात्या यांचं नाव समोर आलेलं आहे. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना आषाढी एकादशीच्या पूजेसाठी पंढरपुरात येण्यास विरोध करणं असो वा महाविकास आघाडीने सरकारच्या वाईनबाबतच्या धोरणावर टीका करताना सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य असो, किंवा 2008 मध्ये डाऊ या केमिकल कंपनीविरोधात केलेलं आंदोलन असो, बंडातात्या कराडकर हे कायमच चर्चेत राहिले आहेत.


VIDEO : Banda Tatya Karadkar Paralysis Attack : बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा झटका ABP Majha



हेही वाचा


बंडा तात्यांची जीभ पुन्हा घसरली! महात्मा गांधींचा म्हातारा असा उल्लेख करत म्हणाले...