मुंबई: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज(25 जानेवारी) मुंबईत 'सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान हा मार्ग ठरवण्यात आला असून या मोर्चाला सर्वपक्षीय नेते तसेच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांचे कुटुंबीय उपस्थित झाले आहेत. मुंबईतील मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानपर्यंत असलेल्या या मोर्चाला आता सुरुवात झाली आहे. या मोर्च्यानंतर एक सभा पार पडेल आणि त्यानंतर मोर्चा संपणार आहे.
दरम्यान, या आंदोलकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाईल आणि त्या ठिकाणी सध्या चौकशीची काय परिस्थिती आहे, ती उघड करा यासाठी ही मागणी करणार असल्याचे पुढे आले आहे. तसेच आज या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे देखील सांगण्यात आले आहे. एकंदरीत राज्यातील अनेक भागात निघालेल्या आक्रोश मोर्चानंतर बीड आणि परभणीमधील घटनांची धग आता राज्याच्या राजधानीत पोहचल्याचे चित्र आहे.
शासनाला आम्ही वारंवार मागणी केली आहे की, जो फरार आरोपी आहे त्याचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक केली जावी. तसेच जे आरोपी पकडले आहेत त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचे प्रकरण असेल किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचे प्रकरण असेल, यात क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. समाजात या घटनांबद्दल आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने या लोकभावनेची दखल घेऊन सक्त कारवाई करावी, अशी मागणी या मोर्चातील आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
चौकशीची सद्यस्थिती उघड करा - ज्योती मेटे
दरम्यान, आजच्या जन आक्रोश मोर्चात शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे, भाजप आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, यांच्यासह देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीय देखील या मोर्चात सहभागी होणार आहे. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान पर्यंत हा जन आक्रोश मोर्चा असणार आहे. सध्या घडीला शेकडोंच्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे. या मोर्चानंतर सभेचे देखील आयोजन करण्यात आले असून यावर अनेकांकडून भाषण देखील केले जाणार आहे. तर लवकरच या आंदोलकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. ज्योती मेटे यांनी या संदर्भातील माहिती दिली असून या संपूर्ण प्रकरणाची आतापर्यंतच्या कारवाईची माहिती उघड करा, अशी मागणी ही ज्योती मेटे यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कधी पकडणार असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
नैतिकता म्हणून तरी या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा
राज्यात एकीकडे सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला त्यातील आरोपी प्रशासनानं काही तासात शोधून काढला. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील वाल्मीक कराडला शोधण्यासाठी 20 - 20 दिवसांचा अवधी लागला. दुसरीकडे याच प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तो काय देश सोडून गेला असेल का? शासनाच्या नाकर्तेपणामुळेच प्रकरणात दिरंगाई होत आहे. यात पोलीस प्रशासनाचा कुठलाही दोष नाही. नैतिकता म्हणून तरी या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. यात कदाचित उद्या वाल्मीक कराड हे निर्दोष निघाले तर त्यांनी पुन्हा आपले मंत्रीपद स्वीकारावे. अशी मागणी ही मराठा आंदोलकांनी केली आहे.
हे ही वाचा